spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मार्कंडादेव मुख्य मार्गावर जड वाहतुकीला प्रतिबंध

– ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे मंदिर परिसराला धोका; तहसील कार्यालयाकडून कारवाईबाबत माहिती

गडचिरोली :- चामोर्शी तालुक्यातील प्रसिद्ध मार्कंडादेव मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरून होणाऱ्या ओव्हरलोड रेती वाहतुकीला अखेर प्रतिबंध घालण्यात आला आहे. रेतीच्या जड वाहतुकीमुळे मार्कंडादेव मंदिर परिसरातील रस्त्याची तसेच पुरातन वास्तूंची सुरक्षितता धोक्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकारी गडचिरोली कार्यालयामार्फत संबंधित यंत्रणेला कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले होते.

मार्कंडादेव बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार विकास संस्था, मार्कंडादेवचे अध्यक्ष प्रा. संतोष छबिलदास सुरपाम यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडे निवेदन सादर केले होते. मार्कंडादेव परिसरालगतच्या रस्त्याने मोहुली येथून मोठ्या प्रमाणात रेतीचे ट्रक वाहतूक करीत असल्याने मंदिर परिसराला धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते.

मार्कंडादेव हे विदर्भातील काशी म्हणून प्रसिद्ध असून येथे पुरातन मंदिर व वास्तू आहेत. या मार्गावरून मोठ्या क्षमतेचे रेती वाहतूक करणारे ट्रक मोठ्या प्रमाणात धावत असल्याने मंदिर परिसरातील रस्त्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. तसेच या मार्गाचा स्थानिक नागरिक, भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे ओव्हरलोड वाहतुकीमुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली होती.

या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने ई-मेलद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी प्रकरण पाठविले. त्यानंतर संबंधित महसूल प्रशासनाकडून चौकशी व पाहणी करण्यात आली.

चामोर्शी तहसीलदार कार्यालयाने १० ऑगस्ट २०२६ रोजी याबाबतची माहिती उपविभागीय अधिकारी, गडचिरोली यांना कळविली आहे. तहसील कार्यालयाच्या अहवालानुसार, जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या आदेशान्वये संबंधित रेतीघाटाच्या परवानगीबाबत कार्यवाही करण्यात आली असून वाहतुकीसाठी निर्धारित मार्ग व नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तहसीलदारांच्या अहवालात नमूद केल्यानुसार, सध्या मौजा मार्कंडादेव येथील गावाच्या मुख्य रस्त्यावरून अथवा मार्कंडादेव मंदिर परिसरातून कोणत्याही मोठ्या ट्रकने रेती किंवा वाळूची वाहतूक केली जात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मंदिर परिसराच्या सुरक्षेला प्राधान्य

मार्कंडादेव मंदिर हे ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्याने या परिसरातून अवजड व ओव्हरलोड वाहनांची वाहतूक होऊ नये, अशी स्थानिक नागरिकांची मागणी होती. मुख्यमंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि चामोर्शी तहसील प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे या मागणीला आता सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

रेती वाहतुकीवर नियंत्रण आल्याने मार्कंडादेव मंदिर परिसराची सुरक्षितता वाढण्यासोबतच भाविक व स्थानिक नागरिकांच्या वाहतुकीलाही दिलासा मिळणार आहे.

Popular Articles