हंसराज, भंडारा:- सध्याच्या काळात अनधिकृत डिजिटल लेंडिंग ॲप्स (Digital Lending Apps) आणि काही संशयास्पद कंपन्यांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः मध्यमवर्गीय नागरिक, सेवानिवृत्त व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना या जाळ्यात ओढले जात असल्याचे पोलिसांनी निदर्शनास आणून दिले आहे.
अल्पवधीत ट्रेडिंगच्या माध्यमातून लखपती करण्याचे आमिष दाखवणे किंवा कोणत्याही कागदपत्रांशिवाय तात्काळ कर्ज देण्याचे प्रलोभन दाखवून ही फसवणूक केली जाते. अनधिकृत ॲप्सच्या माध्यमातून नागरिकांची वैयक्तिक माहिती, बँक खात्याचा तपशील आणि मोबाईलमधील संपर्क क्रमांक (Contacts) मिळवले जातात. त्यानंतर या माहितीचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक केली जाते.
नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी? पोलीस प्रशासनाने नागरिकांसाठी पुढील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत: • कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद ‘डिजिटल लेंडिंग ॲप’ डाऊनलोड करू नका. • कर्ज देण्याच्या नावाखाली आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करूनका. • आपला ओटीपी (OTP), एटीएम पिन, सीव्हीव्ही (CVV) किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका. • कर्ज मंजूर करण्यापूर्वी ‘प्रोसेसिंग फी’ किंवा इतर शुल्काच्या नावाखाली आगाऊ पैसे मागितल्यास सावध राहा. • संशयास्पद ॲप्सना मोबाईलमधील कॉन्टॅक्ट्स, फोटो किंवा मेसेज पाहण्याची परवानगी (Permissions) देऊ नका. • कोणत्याही आर्थिक व्यवहारापूर्वी संबंधित कंपनी किंवा संस्था अधिकृत आहे का, याची खात्री करा.
फसवणूक झाल्यास काय करावे? जर एखाद्या नागरिकाची आर्थिक फसवणूक झाली असेल, तर त्यांनी वेळ न घालवता तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा भंडारा येथील ‘आर्थिक गुन्हे शाखे’शी संपर्क साधावा. तसेच, संबंधित बँक किंवा युपीआय (UPI) सेवा देणाऱ्या कंपनीला माहिती देऊन तातडीने तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आर्थिक गुन्हे शाखा, भंडारा यांच्यामार्फत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि बैठकांच्या माध्यमातून मोहीम राबवण्यात येत आहे. “नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये आणि सायबर सुरक्षेचे नियम पाळावेत,” असे आवाहन भंडारा जिल्हा पोलिसांनी केले आहे.








