कामठी :- कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीची सध्याची जागा स्थलांतरित करण्याच्या हालचालींना बाजार समितीतील अडते, व्यापारी तसेच शेतकरी वर्गातून तीव्र विरोध होत आहे. बाजार समिती स्थलांतरित झाल्यास त्याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीला तसेच बाजार समितीवर अवलंबून असलेल्या अडते व व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला बसणार असल्याने “बाजार समिती आहे त्याच ठिकाणी कायम ठेवावी”, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेच्या स्थलांतराबाबत तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार (नझूल) यांच्याकडून १० ऑगस्ट २०२६ रोजी जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. या जाहिरनाम्यावर हरकती नोंदविण्याची अंतिम मुदत १७ ऑगस्ट होती. मात्र, मोठ्या प्रमाणावर शेतकरी, अडते व व्यापारी हरकत नोंदविण्यास इच्छुक असल्याने हरकती सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी बाजार समितीकडून करण्यात आली आहे.
बाजार समिती स्थलांतरित झाल्यास शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी खासगी व्यापाऱ्यांकडे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ मिळण्याबरोबरच व्यवहारातील पारदर्शकतेवरही परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे. दुसरीकडे बाजार समितीच्या विद्यमान ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या अडते व व्यापाऱ्यांच्याही व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
स्थलांतरामुळे शेतकरी, अडते आणि व्यापाऱ्यांवर अन्याय होऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. त्यामुळे बाजार समितीची जागा स्थलांतरित करून ती नगर परिषदेकडे देण्याच्या प्रस्तावाला संबंधित घटकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
दरम्यान, बाजार समितीच्या जागेच्या प्रश्नावर शेतकरी, अडते व व्यापारी वर्गाची भूमिका प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी आणि कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधित घटकांशी चर्चा करावी, अशी मागणी जोर धरत आहे. शेतकऱ्यांच्या हिताशी निगडित असलेल्या बाजार समितीच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याने आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








