spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

काँग्रेसच्या पानिपताला गटबाजीच कारणीभूत?

संदीप कांबळे, कामठी तालुका वार्तापत्र

कामठी :- एकेकाळी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा कामठी विधानसभा मतदारसंघ आज काँग्रेससाठी राजकीय चिंतेचा विषय ठरला आहे. १९९५ पासून तब्बल तीन दशकांचा विधानसभा विजयाचा दुष्काळ, प्रत्येक निवडणुकीनंतर उफाळून येणारी अंतर्गत नाराजी आणि नेत्यांमधील राजकीय कुरघोड्या यामुळे काँग्रेसची संघटनात्मक ताकद खिळखिळी झाली आहे का, असा सवाल आता कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

पराभवातून धडा घेण्याऐवजी गटबाजीचे राजकारण कायम राहिले, तर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही त्याची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे ‘काँग्रेसचा पराभव विरोधकांच्या ताकदीमुळे की घरातीलच गटबाजीमुळे?’ हा प्रश्न कामठीच्या राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे.

काँग्रेसच्या सुवर्णकाळाला १९९५ मध्ये लागला ब्रेक

१९६२ मध्ये कामठी विधानसभा मतदारसंघाची स्थापना झाल्यानंतर अनेक वर्षे काँग्रेसचे या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व होते. आनंतराम चौधरी, सुलेमान खान पठाण, तेजरावसिंह भोसले, सुरेश देवतळे आणि यादवराव भोयर यांसारख्या नेत्यांनी काँग्रेसचा झेंडा विधानसभेत फडकविला.

मात्र, १९९५ ची निवडणूक काँग्रेसच्या राजकीय अधोगतीचा टर्निंग पॉइंट ठरली. काँग्रेसचे उमेदवार यादवराव भोयर यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली. देवराव रडके यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविल्याने काँग्रेसच्या मतांचे विभाजन झाले. रडके यांनी ५९ हजार ७३८ मते मिळवून भोयर यांचा २२ हजार ८०१ मतांनी पराभव केला.

एकाच घरातील मतविभाजनाचा फटका पक्षाला बसू शकतो, याचा धडा त्याच वेळी मिळाला; मात्र पुढील राजकीय वाटचालीत काँग्रेसने त्यातून पुरेसा बोध घेतला का, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.

२००४ मध्ये पुन्हा ‘घरभेदी’ राजकारण

१९९९ मध्ये काँग्रेस-रिपब्लिकन आघाडीतून अॅड. सुलेखा कुंभारे यांनी विजय मिळविला. मात्र, २००४ मध्ये पुन्हा पक्षांतर्गत नाराजीचा फटका काँग्रेसला बसला. अॅड. सुलेखा कुंभारे यांच्या विरोधात काँग्रेसमधील नाराज घटकांनी पुरुषोत्तम शहाणे यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरविल्याने मतविभाजन झाले.

या मतविभाजनाचा थेट राजकीय फायदा भाजप-सेना युतीचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना झाला आणि कामठीच्या राजकारणात काँग्रेसच्या हातातून सत्ता निसटत गेली.

यानंतर भाजपने संघटन मजबूत करत आपले राजकीय वर्चस्व वाढविले; मात्र काँग्रेस मात्र अंतर्गत मतभेद, नेतृत्वाचे प्रश्न आणि गटबाजीच्या भोवऱ्यातून पूर्णपणे बाहेर पडू शकली नाही.

तीन दशकांत विजयाची पाटी कोरीच!

२००९ मध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या सुनीता गावंडे यांचा पराभव केला. २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांचा पराभव करत सलग तिसरा विजय मिळविला. २०१९ मध्ये भाजपचे टेकचंद सावरकर यांनी काँग्रेसचे सुरेश भोयर यांचा ११ हजार ११६ मतांनी पराभव केला.

२०२४ मध्ये काँग्रेसने पुन्हा सुरेश भोयर यांच्यावर विश्वास टाकला; मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी तब्बल ४० हजार ९४६ मतांनी विजय मिळविला.

तीन दशकांचा हा प्रवास काँग्रेससाठी केवळ पराभवांची आकडेवारी नसून संघटनात्मक आत्मपरीक्षणाचा आरसा आहे.

‘दत्तक मतदारसंघ’ तरीही गटबाजीचे ग्रहण कायम?

२०१९ च्या पराभवानंतर काँग्रेसचे माजी मंत्री सुनील  केदार यांनी कामठीला ‘माझा दत्तक मतदारसंघ’ संबोधत संघटन मजबूत करण्याची भूमिका घेतली होती. काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, २०२४ च्या पराभवानंतर पक्षातील अंतर्गत समीकरणे पुन्हा बदलल्याची चर्चा आहे.

एका बाजूला सुनीलबाबू केदार, प्रा. अवंतिका लेकुरवाडे व शकुर नागाणी यांच्या नेतृत्वाभोवती एक गट, तर दुसऱ्या बाजूला सुरेश भोयर यांच्या नेतृत्वाभोवती दुसरा गट सक्रिय असल्याची चर्चा आहे.

याचा सर्वाधिक फटका कोणाला बसतो? नेत्यांना नव्हे, तर तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्याला.

‘नेत्यांनी आपापली राजकीय ताकद वाढवावी; पण त्यासाठी पक्षाचीच ताकद कमी का करावी?’ असा सवाल सामान्य कार्यकर्त्यांमधून उपस्थित होत आहे.

निवडणुका जिंकणारे नेते विधानसभेत का हरतात?

कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसने विविध पातळ्यांवर यश-अपयश अनुभवले आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे असूनही विधानसभा निवडणुकीत पक्षाला सातत्याने अपयश का येते, याचे उत्तर शोधणे काँग्रेससाठी अत्यावश्यक झाले आहे.

सुनीलबाबू केदार यांचे नेतृत्व, खासदार श्यामकुमार बर्वे, प्रा. अवंतिका लेकुरवाडे, शकुर नागाणी आणि सुरेश भोयर यांच्याभोवती निर्माण झालेले राजकीय प्रवाह एकाच दिशेने वाहिले, तर काँग्रेसला पुन्हा उभारी मिळू शकते. मात्र, एकाच पक्षातील नेते एकमेकांनाच राजकीय आव्हान देत राहिले, तर विरोधकांना वेगळे काही करण्याची गरजच उरणार नाही, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.

रिपब्लिकन मतपेढीची साथ; तरीही काँग्रेसला विजय का नाही?

कामठी मतदारसंघात रिपब्लिकन विचारसरणीशी संबंधित मोठा मतदारवर्ग काँग्रेसच्या पारंपरिक राजकीय आधाराचा भाग राहिला आहे. त्यामुळे काँग्रेससमोर आजही सामाजिक व राजकीय समीकरणांची मोठी संधी आहे.

मात्र ही मतपेढी आपल्यासोबत ठेवण्यासाठी केवळ निवडणुकीच्या काळातील राजकीय समीकरणे पुरेशी ठरणार नाहीत. विश्वास, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि मजबूत बूथ संघटन यांची गरज आहे.

आता तरी ‘घरातील युद्धा’ला पूर्णविराम?

काँग्रेससमोर आज सर्वात मोठे आव्हान विरोधकांपेक्षा स्वतःच्या घरातील मतभेदांचे आहे, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. तीन दशकांच्या पराभवानंतरही जर पक्षाने वस्तुनिष्ठ आत्मपरीक्षण केले नाही, तर आगामी निवडणुकांमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केवळ निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांनी एकत्र येऊन छायाचित्र काढणे पुरेसे नाही. बूथपासून नेतृत्वापर्यंत एकच दिशा, एकच रणनीती आणि एकसंघ संघटन उभे करावे लागेल.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेससाठी केवळ सत्तेची परीक्षा नसून २०२९ च्या विधानसभा लढतीची रंगीत तालीम ठरणार आहेत.

या निवडणुकांपूर्वी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते खरोखरच एका व्यासपीठावर येणार का? कार्यकर्त्यांच्या मनातील नाराजी दूर करणार का? की पुन्हा एकदा तिकीट, नेतृत्व आणि वर्चस्वाच्या राजकारणात पक्षाचीच ताकद खर्च होणार?

१९९५ पासून सुरू असलेल्या पराभवाच्या मालिकेला पूर्णविराम देण्याची संधी काँग्रेससमोर आजही आहे. मात्र त्यासाठी प्रथम विरोधकांशी नव्हे, तर स्वतःच्या गटबाजीशी लढावे लागणार आहे.

काँग्रेसचा खरा ‘पानिपत’ विरोधकांनी केला की घरातीलच गटबाजीने? या प्रश्नाचे उत्तर आता काँग्रेसच्या नेत्यांनीच द्यायचे आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.