कामठी :- ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन करताना डीसीपी संदीप पखाले यांनी डीजेच्या वाढत्या आवाजाबाबत आयोजकांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला. “डीजेचा अमर्याद आवाज कुणाच्या जीवावर बेतू शकतो, त्यामुळे उत्सव साजरा करताना इतरांच्या जीविताची आणि आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे,” असे आवाहन त्यांनी संत कबीर वाचनालय सभागृहात ईद ए मिलाद निमित्त आयोजित सभेत सांगितले.याप्रसंगी एसीपी अंकुश खेडकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिघे,वाहतूक पोलीस निरीक्षक बन्सोड तसेच नगर परिषद चे प्रदीप भोकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
ईद-ए-मिलाद मिरवणूक व विविध कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा, निर्धारित वेळेचे बंधन तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची आयोजकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
उत्सव हा आनंदाचा असला तरी त्यातून नागरिकांना त्रास होणार नाही, याची जबाबदारी आयोजकांवर आहे. धार्मिक उत्सवाच्या नावाखाली नियमांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट संदेशही डीसीपी पखाले यांनी सभेत दिला.
ईद-ए-मिलादचा उत्सव शांतता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत साजरा करण्याचे आवाहन करत पोलिस प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.





