spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ग्रामसभेच्या सचिवपदाची जबाबदारी अन्य विभागातील कर्मचाऱ्यांकडे द्या !

– शिवरे ग्रामपंचायतीतील हल्ल्याच्या घटनेनंतर ग्रामपंचायत अधिकारी युनियनचा आक्रमक पवित्रा; कामठी तालुका शाखेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

कामठी :- ग्रामसभेच्या कामकाजादरम्यान ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE-136, शाखा कामठीने आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्रामसभेच्या कामकाजासाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांऐवजी अन्य विभागातील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी ठोस मागणी युनियनच्या वतीने करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील मौजा शिवरे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेच्या कामकाजादरम्यान ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या दुर्दैवी घटनेचा युनियनने तीव्र निषेध नोंदविला आहे. ग्रामसभेचे कामकाज पार पाडताना ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, अशा परिस्थितीत त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण ठेवणे योग्य नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या म्हणण्यानुसार, ग्रामसभेच्या कामकाजाची जबाबदारी पार पाडताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेकदा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यातून वाद निर्माण होऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्रामसभेचे कामकाज सुरक्षित व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे युनियनने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर दि. १८ ऑगस्ट २०२६ पासून पुढे अनिश्चित कालावधीसाठी ग्रामसभेच्या कामकाजामध्ये ग्रामसभेचे सचिव म्हणून ग्रामपंचायत अधिकारी कामकाज करणार नसल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या निर्णयानुसार तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या ग्रामसभांसाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या ऐवजी अन्य विभागातील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्याबाबत योग्य त्या सूचना निर्गमित कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे अध्यक्ष/सचिव यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन गटविकास अधिकारी, पंचायत समिती कामठी यांना सादर करण्यात आले ग्रामसभा सुरळीत चालविण्यासाठी प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, तसेच ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची ठोस हमी द्यावी, अशी मागणी युनियनने केली आहे. निवेदन देताना ग्रामसेवक सुनील वानखेडे,सुनील ईचे, दिनकर झाडे, संगीता भोले, स्नेहा ठाकरे, संदीप वंजारी, निता टिकले, सचिन खोडे, उदय चांदूरकर,. गिरिधर उइके, श्याम उंचेकर, विकास शहारे, उमेश धांडे, शैलेश तोंडकर, निलकंठ देवगाडे, अमोल वाघ, आतिपकुमार देशभ्रतार,धैर्याधर झोंडे, चेतनकुमार चाफले , संयुक्ता अवथे, भारती मेघाम,  अनिकेत जुमळे, अक्षता जाधव, मोनाली चौधरी,शुभांगी मोहने, तुषार सातपुते,तुषार गावंडे, अमोल वाघ,शैलेश दांडेकर, आदी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.