पांढरकवडा :- शहरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या उत्सवात स्थानिक ‘मित्र क्रीडा मंडळ’ च्या खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अतिशय तांत्रिक कौशल्याने मानवी मनोरे रचून शहरातील विविध भागांतील दहीहंड्या फोडत बाजी मारली. विशेष म्हणजे, संपूर्ण उत्सवादरम्यान शहरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही व एकही गोविंदा जखमी झाला नाही, ज्यामुळे हा उत्सव अत्यंत शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पडला.
यंदा शहरामध्ये विविध संघटना, व वैयक्तिक स्तरावर मोठ्या प्रमाणात दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी लाऊडस्पीकरवर गोविंदांची गाणी तर काही ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला होता. शहरात एकूण तीन प्रमुख गोविंदा पथकांच्या वतीने दहीहंडी फोडण्याचे प्रयत्न करण्यात आले, ज्यामध्ये सर्वाधिक दहीहंड्या मित्र क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी फोडल्या.
मित्र क्रीडा मंडळाचे पहिल्याच प्रयत्नात यश
शहरातील डायमंड चौकात रजनीकांत बोरेले यांनी अत्यंत उंच अशी दहीहंडी लावली होती. ही दहीहंडी फोडण्यासाठी तालुक्यातील वसंत नगर येथील ‘संत सेवालाल गोविंदा पथक’ व पांढरकवडा येथील ‘शहिद भगतसिंग गोविंदा पथक’ यांनी प्रत्येकी ७ ते ८ वेळा प्रयत्न केले. मात्र, दहीहंडी अतिशय उंचीवर असल्याने दोन्ही पथकांना ती फोडण्यात अपयश आले.
त्यानंतर मैदान उतरलेल्या ‘मित्र क्रीडा मंडळ’च्या गोविंदा पथकाने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवत पहिल्याच प्रयत्नात ती उंच दहीहंडी फोडून उपस्थितांची मने जिंकली.
सर्वाधिक दहीहंड्या फोडत नागरिकांची जिंकली दाद
मित्रा क्रीडा मंडळाच्या पथकाने केवळ डायमंड चौकातीलच नव्हे, तर पत्रकार मित्र परिवाराच्या वतीने बिरसा मुंडा चौकात लावलेली उंच दहीहंडीसुद्धा अत्यंत कौशल्याने फोडली. याचप्रमाणे शहरातील लायब्ररी चौक, मेन रोड यासह विविध भागांतील छोट्या-मोठ्या सर्वाधिक दहीहंड्या याच पथकाने फोडल्या. अत्यंत तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित मानवी मनोरे रचून दहीहंड्या फोडणाऱ्या मित्र क्रीडा मंडळाच्या खेळाडूंच्या या कामगिरीचे उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत करत मोठी दाद दिली.





