– चंद्रभागा विद्यालयात शिक्षक दिनाचा अनोखा उपक्रम; विद्यार्थ्यांनी सांभाळली अध्यापनाची धुरा, शिक्षकांच्या जबाबदारीची घेतली प्रत्यक्ष अनुभूती
पंकज परशुरामकर, राजोली (विशेष प्रतिनिधी) :- भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त राजोली येथील चंद्रभागा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या शिक्षक दिनाचे वैशिष्ट्य ठरले ते विद्यार्थ्यांनीच एक दिवसासाठी शिक्षक आणि प्राचार्याची भूमिका स्वीकारून शाळेच्या शैक्षणिक कारभाराची धुरा सांभाळणे. विद्यार्थ्यांच्या या स्वयंशासन उपक्रमामुळे संपूर्ण शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण, पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका स्वीकारत वर्गनियंत्रण, अध्यापन आणि शिस्तीची जबाबदारी आत्मविश्वासाने पार पाडली. शिक्षकांच्या भूमिकेत उभे राहताना विद्यार्थ्यांना अध्यापनासोबतच वर्गातील शिस्त राखणे, प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देणे आणि विषय समजावून सांगणे यामागील कष्टाची प्रत्यक्ष अनुभूती आली.
या अनोख्या अनुभवामुळे शिक्षकांचे कार्य केवळ वर्गात शिकविण्यापुरते मर्यादित नसून त्यामागे संयम, नियोजन, जबाबदारी आणि सातत्यपूर्ण मेहनत असते, याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली तसेच आपल्या जीवनात शिक्षकांचे स्थान किती महत्त्वाचे आहे, याबाबत भावना व्यक्त केल्या.
विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे प्राचार्य व शिक्षकवृंदाने कौतुक केले. स्वयंशासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, शिस्त, निर्णयक्षमता आणि जबाबदारीची भावना विकसित करण्याचा सकारात्मक संदेश या उपक्रमातून मिळाला. विद्यार्थ्यांनी दिवसभर शिक्षकांच्या भूमिका समर्थपणे पार पाडत शिक्षक दिनाला वेगळेच रूप दिल्याने चंद्रभागा विद्यालयातील हा सोहळा संस्मरणीय ठरला.





