– ३६ महिलांना तीन महिन्यांचे मोफत प्रशिक्षण; रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधींवर भर देत नवी दारे उघड
खापा, वार्ताहर :- महिलांना कौशल्य प्रशिक्षणातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने डॉ. आयुशी आशिष देशमुख द्वारे संचालित ‘माझी माऊली फाऊंडेशन’ च्या पुढाकारातून खापा शहरात ‘हातमाग कौशल्य तथा कार्पेट निर्मिती प्रशिक्षण केंद्रा’चा गुरुवारी (दि. ३) शुभारंभ करण्यात आला.
महिला व बाल विकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), नागपूर यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत (PMKKKY 2025-26) हे केंद्र उभारण्यात आले आहे. आस्था लोकसंचालित साधन केंद्र (CMRC), नागपूर (ग्रा.) यांच्या माध्यमातून केंद्राचे संचालन, तर लोकर संशोधन संघ (WRA), मुंबईच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात खापा शहरातील ३६ महिलांना सलग तीन महिन्यांचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून हातमाग संचालन, उत्पादन व व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार आहे. प्रशिक्षणानंतर महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे.
या केंद्रासाठी आमदार डॉ. आशिष देशमुख व माझी माऊली फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. आयुशी देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले. ‘कौशल्यातून रोजगार आणि रोजगारातून आर्थिक स्वावलंबन’ या उद्देशाने सुरू झालेला हा उपक्रम खापा शहरातील महिला सक्षमीकरणाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
यावेळी माझी माऊली फाऊंडेशनचे समन्वयक सोनू नवधिंगे, नगरध्यक्ष पियूष बुरडे, उपनगराध्यक्ष सुनील पाहुणे, महिला व बालकल्याण सभापती वैशाली चंद्रकांत लिखार, शिक्षण सभापती अंजली आनंद मेनकुदळे, बांधकाम सभापती किशोर आष्टनकर, नगरसेविका शोभाताई कारणकर, नगरसेवक पुष्पेंद्र (मुन्ना) शर्मा यांच्यासह नगर परिषद अधिकारी – कर्मचारी, महिला बचत गटाच्या सदस्या, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.





