– पोलिस अधिकाऱ्यांसमोर रोष व्यक्त; गस्त वाढवून दोषींवर कारवाईची मागणी
वाडी :- गेल्या दोन महिन्यांपासून वाडी परिसरातील विविध नगरांमध्ये चोरी, महिला छेडछाड तसेच अन्य गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांतील आरोपी अद्याप पकडले गेले नसल्याने नागरिकांमध्ये पोलिस विभागाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.
दत्तवाडी येथील सत्य साई सोसायटी, गजानन प्रसाद सोसायटी, समर्थ गजानन सोसायटी आणि रामकृष्ण नगर येथील शेकडो नागरिकांनी वाडी पोलिस ठाण्यात जाऊन एसीपी यशवंत नलवडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन मगर आणि पोलिस निरीक्षक रामेश्वर दराडे यांची भेट घेतली. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडून निवेदनही दिले.
परिसरात दिवस-रात्र संशयास्पद हालचाली वाढल्याने नागरिक चिंतेत असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. पोलिसांची गस्त सुरू असतानाही चोरीच्या घटना थांबत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. तसेच नागरिक आणि युवक रात्रीच्या वेळी परिसरात पहारा देऊन पोलिसांना सहकार्य करीत असल्याचेही सांगण्यात आले.
यापूर्वी पोलिसांनी सुरक्षा वाढवून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, घटनांमध्ये अपेक्षित घट न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. पोलिस अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत योग्य ती कारवाई करण्याचे तसेच सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी वाडी विकास संघर्ष आघाडीचे कार्याध्यक्ष मधु माणके पाटील, उपाध्यक्ष अमित हुसनापुरे, तसेच नारायणराव गोतमारे, कृष्णराव कुहीकर, सुनील पाटील, अरुण कराळे, प्रमोद तराळेकर, भाऊराव लंबोदरी, प्रदीप पाटील, गजेंद्र समरीत, नवनाथ बागवाले, विनोद अतकरी, विवेक पंचबुध्ये, अजय मानकर, शैलेश गणोरकर, विजय बुरडे, विजय सिंग बैस, कमलाकर घोरमारे, राजेश कुशवाहा, अशोक सोरते, अंकित सपाटे, बाळकृष्ण भुजाडे, अरुण पगाडे, दादाराव राजस, अशोक डोंगरे, रामकिशोर शर्मा, हर्ष कापसे, महेंद्र कडू, सुधाकर वानखेडे, रमेश वानखडे, नारायण लांजेवार, गजानन वैद्य, रामकृष्ण ताजने, देवानंद मेश्राम, स्वप्निल पौनिकर, गजेंद्र देवघरे, शैलेश बडोले, तसेच अहिंसा मेश्राम, मीनाक्षी खोब्रागडे, रंजना कापसे, शेवती पराते, निशा वासनिक, जयश्री पाटील, पुष्पा वाडिभस्मे, संध्या गेडाम, लता पाटील, शोभा राजे, मीनल कुलकर्णी व सौ. ढवळे यांच्यासह शेकडो महिला व पुरुष नागरिक उपस्थित होते.





