मुंबई :- मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे राज्यातील पावसाची तूट वाढली आहे. पुढील काही दिवसात हवामान प्रणालींच्या सक्रियतेमुळे राज्यात पावसाचा जोर काहीसा वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत निम्म्या राज्यावर वादळी पावसाचा प्रभाव वाढणार असून मागील काही दिवसांच्या तुलनेत नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल, असा अंदाज आहे.
राज्यात जुलै महिन्यात बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालींच्या सक्रियतेमुळे सर्वदूर पावसाची नोंद झाली. त्यामुळे जून महिन्यात असणारी पावसाची तूट काहीशी भरून निघाली. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने पुन्हा ओढ दिल्याने सध्या राज्यातील बहुतांश भागात पावसाची मोठी तूट कायम आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. मोसमी पावसाचा हंगाम अखेरच्या टप्प्यात असून पुढील काही दिवसात चांगला पाऊस झाल्यास दुष्काळाची छाया असणाऱ्या भागांना काहीसा दिलासा मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
शुक्रवारपासून वादळी पावसाचा अंदाज
यंदा जागतिक पातळीवर हवामान बदलाचे परिणाम तीव्र होऊ लागले आहेत. युरोपातील अनेक भागात उष्णता वाढल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ स्थिती पुढील काही महिन्यात अधिक तीव्र होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ‘एल निनो’ स्थितीचे परिणाम पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या मान्सूनच्या हंगामावर ‘एल निनो’चा प्रभाव असून पावसाचे प्रमाण असमान असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात शुक्रवारपासून काही भागात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून शनिवारी त्याचा प्रभाव वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बहुतांश भागात पावसाचा जोर काहीसा वाढेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
शुक्रवारी ‘यलो अलर्ट’ कुठे ?
हवामान विभागाने शुक्रवारी नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली आदी भागांना ‘यलो अलर्ट’ दिला आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात आणि मराठवाड्यातील उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच शनिवारपासून कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्टातील बहुतांश जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
त्यामुळे येत्या काही दिवसांत पावसाची मोठी तूट असणाऱ्या प्रदेशांना काहीसा दिलासा मिळेल असा अंदाज आहे.





