मुंबई :- राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना मारायचे आहे. मनोज जरांगे हे सरकारच्या गळ्यातील फास झाले आहेत, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. मनोज जरांगे पाटलांची लढाई आणि त्यांचा संघर्ष हा सत्ताधाऱ्यांच्या गळ्यातील फास बनला आहे. मनोज जरांगे पाटील यांचा उपयोग सरकारसाठीचा संपला आहे. सरकारने त्यांच्या उपोषणाचा आणि लढ्याचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करुन घेतला आणि आता जरांगेंना वाऱ्यावर सोडले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 12 वा दिवस आहे. या काळात त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. हे अत्यंत अमानुष आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 12 वा दिवस आहे. त्यांनी अंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्टला उपोषण सुरु केले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. सोमवारी रात्री त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यावेळी मंत्री उदय सामंत आणि प्रसाद लाड यांच्या विनवणीनंतर मनोज जरांगे यांनी सलाईन लावून घेण्यास होकार दिला होता. मात्र, गेल्या 11 दिवसांपासून पोटात अन्नाचा एकही कण न गेल्यामुळे मनोज जरांगे यांना प्रचंड अशक्तपणा आला आहे. त्यांच्या शरीरातील शुगरची पातळीही कमी झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते.
एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रं मिळेपर्यंत उपोषण करण्यावर ठाम असले तरी राज्य सरकार हे आता जरांगेंची फार समजूत काढण्याच्या फंदात पडेल, असे दिसत नाही. मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तसे स्पष्ट संकेत दिले होते. मनोज जरांगे आंदोलनावर ठाम असतील तर तो त्यांचा निर्णय आहे. शासनाकडून जे जे निर्णय करणे आवश्यक होते ते आपण केलेले आहेत. त्यात त्यांचे समाधान होत नाही. आपण प्रयत्न करत आहोत पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या मनात काही अजूनही प्रश्न असतील तर ते आपण सोडवतच आहोत. शेवटी मराठा समाजाच्या व्यापक हिताकरता आपण निर्णय करत आहोत. त्या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा सुरू आहे. त्यात जरांगे पाटील समाधानी नाहीत. त्याच्यामुळे आता माझ्याकडे असा काही पर्याय नाही, ज्यामुळे मी त्यांचे समाधान करू शकेल, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले होते.





