– विलंब करणाऱ्या संबंधित कंत्राटदार व रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
किशोर साहू, मौदा :- चाचेर – निमखेडा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या निमखेडा येथे रेल्वे क्रॉसिंग वर मागील दीड वर्षापासून उडान पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, मात्र अद्यापही उड्डाणपूल सुरू न झाल्याने, तांत्रिक कारणाअभावी विलंब होत असल्यास त्या तांत्रिक अडचणी दूर करून उडान पूल सुर करण्यासाठी, जर काहीही तांत्रिक अडचण नसेल तर विनाकारण विलंब करीत असलेल्या संबंधित कंत्राटदार व रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी चाचेर मंडळातर्फे केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांना रविवार (ता.१३ सप्टेंबर)ला नागपूर येथील गडकरी वाडा येथे जनसंपर्क कार्यक्रम दरम्यान निवेदन देण्यात आले.
मागील अनेक वर्षापासून या रेल्वे फाटकामुळे दररोज शेकडो वाहनधारक, शाळकरी विद्यार्थी कमालीचे त्रस्त राहत असल्याने ,गडकरी यांनी तात्काळ तक्रारीची दखल घेत प्रशासनाला धारेवर घेतले आणि त्या कामाची लवकरच सभा लावून त्यावर तोडगा काढून देण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी निवेदनकर्ते चाचेर मंडळाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपा किसान आघाडी चे जिल्हा महामंत्री तथा ग्रामपंचायत खंडाळा (गांगणेर)सरपंच संकेत झाडे , माजी उपसभापती खेमराज चाफले , डॉ.दिनेश बादोले , अशोक बावनकुळे,निमखेडा ग्रामपंचायत चे सदस्य आक्रोश पानतावणे,उमेश शेंडे व कार्यकर्ते उपस्थित होते.





