संदीप कांबळे,कामठी :- खैरे कुणबी समाजाच्या सामाजिक एकजुटीला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने समाजाच्या एकत्रीकरणाबाबत कामठी तालुक्यातील आजनी येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पश्चिम नागपूर खैरे कुणबी समाजाच्या वतीने आजनी येथील विश्वरंजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत समाजाच्या विविध सामाजिक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. समाजातील विविध घटकांना एका व्यासपीठावर आणून संघटन अधिक बळकट करण्यासाठी गावपातळीपासून प्रयत्न करण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नागपूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य भगवंतराव रडके होते. प्रमुख उपस्थितांमध्ये समाज संघटक महादेवराव वैद्य, मौदा तालुका शिवसेना शाखाध्यक्ष नितेश वांगे यांच्यासह समाजातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.
खैरे कुणबी समाजाच्या सामाजिक संघटनात्मक बांधणीसह समाजासमोरील विविध प्रश्न, सामाजिक सहभाग, परस्पर समन्वय आणि भविष्यातील उपक्रम याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. समाजाची ताकद केवळ संख्येपुरती मर्यादित न राहता ती संघटित स्वरूपात सामाजिक विकासासाठी उपयोगात आणण्याची गरज उपस्थितांनी व्यक्त केली.
समाजाच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया व्यापक करण्यासाठी केवळ एका बैठकीपुरते प्रयत्न मर्यादित न ठेवता गावागावांमध्ये संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील आठवड्यात विविध गावांतील प्रमुख व ठळक कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत स्थानिक पातळीवरील समाजबांधवांची मते, अपेक्षा आणि सूचना जाणून घेण्यात येणार असून त्याआधारे समाजाच्या पुढील वाटचालीची दिशा निश्चित केली जाणार आहे.
समाजातील तरुण, ज्येष्ठ, कार्यकर्ते आणि विविध घटकांना एकत्र आणत संघटनात्मक पातळीवर समन्वय निर्माण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. गावागावांतील समाजबांधवांशी थेट संवाद साधून त्यांच्या भावना आणि अपेक्षा जाणून घेतल्यास एकत्रीकरणाची प्रक्रिया अधिक व्यापक करता येईल, असा सूर बैठकीत उमटला.
खैरे कुणबी समाजाच्या एकत्रीकरणासाठी गावपातळीवरील कार्यकर्त्यांचा सहभाग निर्णायक ठरणार असल्याने आगामी बैठकींकडे समाजबांधवांचे लक्ष लागले आहे. विविध मतप्रवाहांना एकत्र आणत सामूहिक विचारातून पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याने समाजाच्या संघटनात्मक वाटचालीला नवी सुरुवात मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.





