संदीप कांबळे,कामठी :- नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 6 अंतर्गत येणाऱ्या खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील चणकापूर-शिल्लेवाडा वस्ती मार्गावरील गणेश मंदिरासमोर गांजा घेऊन संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या इसमावर झोन-६ पथकाने धडक कारवाई केली. पोलिसांनी त्याच्याकडून ४६४.८५० ग्रॅम गांजा, मोबाईल फोन आणि Honda Activa असा एकूण सुमारे ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई नुकतीच करण्यात आली असून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव शैलेश रामलाल सूर्यवंशी (वय ४४, रा. वॉर्ड क्रमांक २, ओम नगर, चणकापूर, खापरखेडा) असे आहे. आरोपी हा चणकापूर-शिल्लेवाडा वस्ती रोडवरील गणेश मंदिरासमोर स्ट्रीट लाईटच्या उजेडात काळ्या रंगाच्या Honda Activa (एमएच-४९-सीई-५७०५) वरून संशयास्पदरीत्या आढळून आला.दरम्यान पथकाने वाहनाची झडती घेतली असता डिक्कीमध्ये पारदर्शक प्लास्टिक पन्नीत हिरवट-काळसर रंगाचा, उग्र वास असलेला वनस्पतीजन्य पदार्थ आढळला. प्राथमिक तपासणीत हा पदार्थ गांजा असल्याचे निष्पन्न झाले. इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर वजन केल्यानंतर पॅकिंग व सीलबंद साहित्याच्या नोंदीसह त्याचे वजन ४६४.८५० ग्रॅम भरले.
पोलिस चौकशीत आरोपीने सदर गांजा अयुब छुटटन सिध्दीकी (वय ४७, रा. हनुमान मंदिराजवळ, चणकापूर, खापरखेडा) याच्याकडून प्राप्त केल्याचे सांगितल्याची माहिती आहे. या कथित पुरवठ्याच्या धाग्याचा तसेच सिध्दीकीच्या सहभागाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या कारवाईत गांजासह POCO कंपनीचा मोबाईल आणि Honda Activa वाहन जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत ७५ हजार रुपये आहे.
या प्रकरणी आरोपी शैलेश सूर्यवंशी विरुद्ध खापरखेडा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा, १९८५ मधील कलम ८(ब) सह २०(ब)(ii)(c) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अमली पदार्थाच्या पुरवठ्याच्या साखळीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. ही यशस्वी कारवाई डीसीपी रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनार्थ झोन सहा पथकातील हेड कॉन्स्टेबल अरुण चांदणे, हेमचंद सोनवणे,मंगेश लांजेवार आदींनी केली.





