– वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांचे आदेश; नियम मोडल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
हंसराज,भंडारा :- आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भंडारा शहरातील मुख्य बाजारपेठेत होणारी संभाव्य गर्दी, वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगर परिषदेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरातील अतिशय वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या महात्मा गांधी चौक ते पोस्ट ऑफिस चौक या मार्गावर आता ‘सम-विषम’ (Odd-Even) तारखेनुसार पार्किंग व्यवस्था लागू करण्यात आली आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत.
भंडारा शहरातील गांधी चौक ते पोस्ट ऑफिस चौक हा रस्ता मुख्य बाजारपेठेचा भाग असून संपूर्ण जिल्ह्यातून नागरिक येथे खरेदीसाठी येतात. रस्ते निमुळते असल्याने आणि खरेदीदारांची संख्या मोठी असल्याने या भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. सणासुदीच्या काळात ही गर्दी आणखी वाढून वृद्ध, महिला आणि लहान मुलांना पायी चालणेही कठीण होते. तसेच अपघातांची शक्यताही बळावते. यापूर्वीच हा मार्ग एकेरी (One-Way) करण्यात आला असून आता जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पत्रानुसार वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी पार्किंगचे नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
अशी असेल नवी पार्किंग व्यवस्था :
– विषम तारखांना (१, ३, ५, ७, ९…): रस्त्याच्या उजव्या बाजूला वाहने पार्क करावी लागतील.
– सम तारखांना (२, ४, ६, ८…): रस्त्याच्या डाव्या बाजूला वाहने पार्क करावी लागतील.
मुख्य रस्त्यावरील स्थानिक रहिवाशांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांना या नियमातून वगळण्यात आले आहे.
सदर आदेश ‘महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक वसाहत अधिनियम १९६५’ च्या विविध कलमांनुसार जारी करण्यात आले आहेत. शहरातील सर्व व्यापारी बांधव, ग्राहक आणि वाहनधारकांनी या पार्किंग नियमांचे काटेकोरपणे पालन करून नगर परिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही नगर परिषद प्रशासनाने दिला आहे.








