– आरोग्य तपासणीपासून स्वच्छता अभियानापर्यंत विविध उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
किशोर साहू, मौदा :- 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या स्वच्छता पंधरवडा अभियान अंतर्गत पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चाचेर येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि कला-कौशल्याशी संबंधित विविध उपक्रम उत्साहात राबविण्यात आले.
या उपक्रमांची सुरुवात विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीने करण्यात आली. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे तसेच आरोग्याबाबत त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने आरोग्य तपासणी करण्यात आली.
चित्रकला व निबंध स्पर्धा, इको क्लबच्या माध्यमातून स्वच्छता अभियान, रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. चित्रकला, निबंध व रांगोळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशप्रेम, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचे संदेश दिले. स्वच्छता अभियानात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शाळेचा परिसर स्वच्छ केला.या सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कल्पनाशक्तीला आणि सामाजिक जाणीवेला चालना मिळाली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल गडपायले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जीवन सहारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक वृंद रविंद्र घुगे,भारती साखरकर,संगीता बालकोटे, प्रिती खंगार, शिल्पा उकुड्डे, परविन शेख, रुचिला खंडाईत व नेहा निमजे यांनी मोलाचे सहकार्य केले.
आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, कला आणि देशभक्तीचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमांमुळे चाचेर शाळेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.








