– डॉ. रामण घुंगराळेकर यांना मिळाला १५ वा सन्मान
यवतमाळ :- यंदाचा स्व. डॉ. भाऊसाहेब पद्मावार स्मृती आयुर्वेद भूषण पुरस्कार आयुष महाराष्ट्र राज्याचे संचालक डॉ. रामण घुंगराळेकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार वितरण सोहळा १ ऑक्टोबर रोजी डा. मा. म. आयुर्वेद महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. आयुर्वेद क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैद्यांना त्यांच्या कार्यगोरवार्थ हा अत्यंत मानाचा पुरस्कार दरवर्षी वितरित केला जातो. यंदाचे हे १५ वे वर्ष आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आयुर्वेद सेवा समिती अध्यक्ष डॉ. सुरेंद्र पद्मावार, प्रमुख अतिथी नवी दिल्लीच्या भारतीय चिकित्सा पध्दती राष्ट्रीय आयोग अध्यक्ष डॉ. मनीषा कोठेकर, गौरवमूर्ती अ. भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरीचे सरचिटणीस पद्मश्री जनार्दन बोथे, सत्कारमूर्ती आयुष महाराष्ट्र राज्याचे संचालक डॉ. रामण घुंगराळेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव मुंदाने, गोरशेट्टीवार यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजीव मुंदाने यांनी केले. यावेळी सत्कारमूर्ती डॉ. रामण घुंगराळेकर यांनी सत्काराला उत्तर देताना आयुर्वेद क्षेत्रातील अजून कोणकोणते कार्य करण्यास वाव आहे, याचा उहापोह केला. एनसीआयएमच्या अध्यक्षा मनीषा कोठेकर यांनी आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांना आयुर्वेदातचा प्रसार, प्रचार करण्यास पुढाकार घेण्याचे आवाहन केले. तसेच सध्या आयुर्वेदाला समाजामध्ये आता मानाचे स्थान प्राप्त होत असल्याचे अधोरेखीत केले. भाऊसाहेब पद्मावार ट्रस्टचे सर्वेसर्वा डॉ. सुरेंद्र पद्मावार यांनी समयोचित मार्गदर्शन केले. सन्मानपत्राचे वाचन डॉ. पुराणिक यांनी केले. संचालन डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल यांनी केले, तर आभार डॉ. समीर बेलोरकर यांनी मानले. परिचय डॉ. संजय पावडे आणि डॉ. दर्शना वरगंटीवार यांनी करुन दिला. कस्तुरी जंगले यांनी धन्वंतरी स्तवन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव मुंदाने, सहकारी प्राध्यापक डॉ. प्रज्ञा घोरमोडे, डॉ. किर्ती राठोड, डॉ. मनोज येरावार, डॉ. अनिल भावडे, प्राध्यापक वंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी शहरातील वैद्य, नागरिक तसेच पद्मावार परिवार उपस्थित होता.








