spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पदवीधर निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरीचे निशाण; आल्हाद भांडारकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!

– पक्षाने तिकीट न दिल्यास अपक्ष लढण्याचा दिला थेट इशारा; विदर्भातील राजकीय वातावरण तापले

हंसराज,भंडारा :- आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, भारतीय जनता पक्षामध्ये पहिली बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लाखणीचे शिक्षण महर्षी बापूसाहेब लाखणीकर यांचे नातू आणि भाजप कार्यकर्ते आल्हाद भांडारकर यांनी पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारीचा दावा ठोकला आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्यास ‘अपक्ष’ म्हणून निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असताना भाजपमधून आल्हाद भांडारकर यांनी थेट निवडणूक लढण्याचा शड्डू ठोकला आहे. या संदर्भात त्यांनी पक्षाचे संघटन मंत्री भूपेंद्र कोठेकर यांची भेट घेऊन स्वतःचे आणि कार्यकर्त्यांचे निवेदन सादर केले आहे. या भेटीदरम्यान त्यांना पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्याच्या सूचना मिळाल्या असून, त्या दिशेनेही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

तिकीट नाही मिळाले, तरी निवडणूक लढणारच!

आपली भूमिका स्पष्ट करताना आल्हाद भांडारकर म्हणाले, “मी पदवीधर मतदारसंघासाठी पक्षाकडे अधिकृत उमेदवारीची मागणी केली आहे. पक्षाने मला संधी द्यावी यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पक्षाने तिकीट नाकारले तरीही मी माघार घेणार नाही. जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम आहे.” लवकरच पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात पुढील रणनीती जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पदवीधरांच्या प्रश्नांवर भर

निवडणुकीच्या अजेंड्याविषयी बोलताना भांडारकर यांनी पदवीधरांच्या ज्वलंत समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. पदवीधरांसाठी १०० टक्के रोजगारनिर्मिती करणे, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे आणि महिला पदवीधरांसाठी व्यावसायिक शिक्षण व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, हाच आपला मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भांडारकर यांच्या या भूमिकेमुळे भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून, पक्षाचे वरिष्ठ नेते या संभाव्य बंडखोरीवर काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Popular Articles