– नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्धार; शैक्षणिक, रोजगारविषयक आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची भूमिका
नागपूर :- वर्धा जिल्ह्यातील प्रसिद्ध बीएचएमएस, सीसीएमपी वैद्यकीय व्यावसायिक आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात अनेक वर्षांपासून सक्रिय असलेले डॉ. बिपीन तुपे यांनी आता नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे डॉ. तुपे आता पदवीधर, विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. डॉ. बिपीन तुपे यांनी यापूर्वी वर्धा जिल्हा परिषद निवडणूक लढवून राजकीय क्षेत्रात आपली उपस्थिती नोंदविली होती. आता त्यांनी थेट नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पदवीधरांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न, रोजगाराच्या संधी आणि सामाजिक न्याय या विषयांना केंद्रस्थानी ठेवून निवडणुकीच्या माध्यमातून व्यापक स्तरावर काम करण्याचा त्यांचा मानस आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या आणि बेरोजगारीचा प्रश्न याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना डॉ. तुपे यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी विविध शैक्षणिक अडचणींचा सामना करीत आहेत. उच्च शिक्षण पूर्ण करूनही अनेक तरुणांना रोजगारासाठी संघर्ष करावा लागत आहे. शिक्षण घेतल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध न होणे, शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी न होणे आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष होणे, अशा अनेक समस्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. निवडणुकीच्या माध्यमातून प्रतिनिधित्व मिळविणारे काही लोक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे पुरेसे लक्ष देत नसल्याची टीकाही त्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या समस्या केवळ निवडणुकी पुरत्या चर्चेत न राहता त्यावर ठोस उपाययोजना व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विशेषतः आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी चिंता व्यक्त केली. आपल्या हक्कांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांना वारंवार आंदोलने करावी लागतात. विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करूनही त्यांच्या प्रश्नांचे समाधानकारक निराकरण होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शिक्षण, शिष्यवृत्ती, शैक्षणिक सुविधा आणि रोजगाराच्या संधी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना आपल्या न्याय्य मागण्यांसाठी वारंवार संघर्ष करावा लागू नये, तर त्यांच्या प्रश्नांची दखल घेऊन संबंधित यंत्रणांनी वेळेत निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा डॉ. तुपे यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्या साठी केवळ निवेदन देऊन किंवा मागण्यांचा पाठपुरावा करून थांबण्याऐवजी त्यासाठी प्रत्यक्ष कृती आणि सातत्यपूर्ण संघर्ष आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात आपली भूमिका मांडताना डॉ. बिपीन तुपे म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या आणि पदवीधरांच्या प्रश्नांसाठी दुसऱ्यांकडे न्याय मागत बसण्यापेक्षा मी स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरून त्यांच्यासाठी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांसाठी वारंवार आंदोलन करावे लागणे ही चिंतेची बाब आहे. त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.” सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील आपल्या अनुभवाचा उपयोग करून पदवीधर मतदारसंघातील विविध प्रश्नांवर काम करण्याचा त्यांचा मानस आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य, बेरोजगार तरुणांचे प्रश्न, आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि पदवीधरांच्या अपेक्षा यांना प्राधान्य देत लोक प्रतिनिधित्वाची नवी दिशा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात नागपूरसह विदर्भातील विविध जिल्ह्यांतील पदवीधर मतदारांचा समावेश होतो. त्यामुळे या मतदारसंघातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व पुढे येणे महत्त्वाचे असल्याचे मत डॉ. तुपे यांनी व्यक्त केले. एकूणच, वर्धा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आता नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उतरण्याच्या डॉ. बिपीन तुपे यांच्या निर्णयामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पदवीधर, विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांचे प्रश्न हेच आपल्या राजकीय भूमिकेचे केंद्रबिंदू राहतील, असा संदेश देत त्यांनी आगामी निवडणुकीसाठी आपली तयारी सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.








