– कयाकिंग व कॅनोइंगमधील दैदिप्यमान यश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाला सत्कार
हंसराज, लाखनी :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित विशेष सत्कार सोहळ्यात लाखनी येथील ‘स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालया’च्या खेळाडूंचा रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात
आला. शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी नागपूर येथील दीक्षाभूमी परिसरातील गुरुनानक भवन येथे हा दिमाखदार सोहळा पार पडला.
शैक्षणिक सत्र २०२३-२४ व २०२४-२५ या कालावधीत ‘खेलो इंडिया आंतर विद्यापीठ’, ‘पश्चिम क्षेत्र आंतर विद्यापीठ’, ‘अखिल भारतीय आंतर विद्यापीठ’ स्पर्धांसह विविध क्रीडा महोत्सवांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पदके जिंकणाऱ्या गुणवंत खेळाडूंना या सोहळ्यात गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पद्मश्री डॉ. सत्यपाल सिंह, प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, कुलसचिव डॉ. विजय खंडाळ, अधिसभा सदस्य विष्णू चांगदे आणि द्रोणाचार्य व अर्जुन पुरस्कार विजेते विजय मुनेश्वर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालयाचे खेळाडू करण शेंडे, करण वाघाये, अमीर निंबार्ते आणि आचल भुरे यांनी जलक्रीडा प्रकारातील ‘कयाकिंग व कॅनोइंग’ (Kayaking & Canoeing) स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरीसह पदके पटकावली होती. या चौघांनाही मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
खेळाडूंच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे आणि शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. एस. जी. सहारे यांनी खेळाडूंचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या पदक विजेत्यांचे कौतुक केले आहे. या यशामुळे लाखनी शहरासह संपूर्ण भंडारा जिल्ह्याच्या क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.








