– प्रशासकीय पथक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
हंसराज,चिचोली / भंडारा :- खरीप हंगाम २०२६ मध्ये पर्जन्यतूट व दुष्काळसदृश परिस्थितीमुळे भंडारा तालुक्याचा समावेश दुष्काळाच्या ‘ट्रिगर-१’ मध्ये करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या निर्देशानुसार भंडारा तालुक्यातील चिचोली येथे महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पथकामार्फत प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहेत.
चिचोली शिवारात प्रामुख्याने धान (भात) पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे उभे पीक करपण्याच्या मार्गावर आहे. त्यातच अपुऱ्या पाण्यामुळे धानाच्या पिकावर खोडकिडा व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीदरम्यान समोर आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून उत्पादनात मोठी घट येण्याची भीती निर्माण झाली आहे.
बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या विहित निकषांनुसार तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पथकाने चिचोली येथील शेतांमध्ये उतरून नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेण्यास सुरुवात केली आहे.
या पीक पाहणी व पंचनाम्यावेळी साहुलीचे तलाठी राकेश कनोजिया, कृषी सहायक उराडे, ग्रामसेवक प्रीती वैद्य, पिंपरीचे सरपंच विक्रम ठवकर, चिचोलीचे पोलीस पाटील शैलेश निंबार्ते तसेच महिला शेतकरी जिजाबाई निंबार्ते यांच्यासह गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








