– सायबर पोलिसांत गुन्हा
बीड :- माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात बीड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका सोशल मीडिया पेजवर राजश्री मुंडे यांचा फोटो वापरून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, विवाहविषयक नाव असलेल्या एका सोशल मीडिया पेजवर राजश्री मुंडे यांचा फोटो वापरून आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करण्यात आला होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर मुंडे यांच्या कार्यालयाकडून याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
मुंडे यांच्या कार्यालयातील सुधीर सांगळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणारी व्यक्ती कोण आहे, याचा शोध बीड सायबर पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास बीड सायबर पोलिसांकडून सुरू आहे.
परळीत आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट
बीडच्या परळीत दर सोमवारी आठवडी बाजार भरत असतो आणि याच आठवडी बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट असल्याचे समोर आले आहे. शहरातील हाडबे रोडवर आठवडी बाजार भरत असतो.याच आठवडी बाजारात गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत अनेक नागरिकांच्या मोबाईलवर डल्ला मारत लंपास केलेत.या घटनेमुळे आठवडी बाजारातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आठवडी बाजारात ज्येष्ठ नागरिकांना तसेच गर्दीत सहज लक्ष्य करता येणाऱ्या नागरिकांच्या खिशातील मोबाईल चोरले जात असल्याच्या पाच ते सहा तक्रारी शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आल्यात.दरम्यान या मोबाईल चोरीच्या घटनांबाबत बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी लक्ष घालून या चोरट्यांचा पक्का बंदोबस्त करावा अशी चर्चा नागरिकांतून केली जात आहे.








