– थेट मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी
मुंबई :- मराठा आरक्षणासह मराठा विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवरून राज्यात आंदोलन सुरू असतानाच आता नाशिकमध्ये मराठा समन्वयक आक्रमक झाले आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपदासह मराठा उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी नाशिकमधील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली आहे. तसेच सारथी संस्थेच्या माध्यमातून राज्यभर मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची उभारणी करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये सारथीची इमारत उभी राहतेय, मग राज्यात का नाही?
नाशिकमध्ये सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची भव्य इमारत उभारली जात आहे. मात्र, नाशिकमध्ये अशा प्रकारची सुविधा उभारली जात असताना राज्यातील इतर भागांमध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याबाबत सरकारकडून ठोस पावले का उचलली जात नाहीत, असा सवाल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे.
‘राधाकृष्ण विखे पाटील नकारात्मक मंत्री’
दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर मराठा समन्वयकांनी जोरदार टीका केली आहे. ‘राधाकृष्ण विखे पाटील हे नकारात्मक मंत्री असून मराठा समाजाची सातत्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत,’ असा आरोप समन्वयकांनी केला आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी इतक्या दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्यापही समाजाच्या पदरात ठोस काही पडलेले नाही, असा दावा करत समन्वयकांनी विखे पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी केली आहे.
मराठा उपसमितीच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचीही मागणी
मराठा उपसमितीचे अध्यक्ष म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांबाबत अपेक्षित निर्णय होत नसतील, तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा तसेच मराठा उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी नाशिकमधील मराठा समन्वयकांनी केली आहे. आता मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आक्रमक झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.








