शारीरिक आरोग्याकडे जितकं लक्ष दिलं जातं तितका विचार मानसिक आरोग्याचा केला जात नाही. तज्ज्ञांच्या मते, रोजच्या जीवनातल्या काही सवयींमुळे मेंदूवरही नकळतपणे परिणाम होतो. यामुळे सवयी बदलण्याची गरज आहे.
दैनंदिन जीवनशैली, काम करण्याची क्षमता अशा अनेक बाबींशी मानसिक निगडित असते. ज्याप्रमाणे शारीरिक आरोग्यासाठी आहार आणि दिनचर्येकडे लक्ष देणं आवश्यक असतं, त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या सवयींवर लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
काही सवयींचा आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर हळूहळू परिणाम होऊ शकतो. आपल्या दैनंदिन दिनचर्येतील छोट्या-छोट्या सवयींचा दीर्घकाळात आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
रात्री उशीरापर्यंत मोबाईलचा वापर, पुरेशी झोप न घेणं, सतत नकारात्मक विचार करणं आणि आहाराकडे दुर्लक्ष करणं यांसारख्या सवयींचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. या सवयी वेळेत ओळखून त्यांत बदल केले, तर उत्तम मानसिक आणि भावनिक आरोग्य राखण्यास मदत होऊ शकते.
मोबाईल फोन आणि सोशल मीडिया हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. लहान मुलं असोत वा प्रौढ, अनेक जण आपला दिवसातील बराचसा वेळ व्हिडिओ, पोस्ट्स आणि इतर प्रकारची माहिती पाहण्यात घालवतात.
सतत स्क्रीनकडे बघत राहिल्यामुळे मेंदूला विश्रांती मिळण्यासाठी फारसा वेळ उरत नाही. सोशल मीडियावरील अनावश्यक किंवा हानिकारक माहितीचा संपर्क मानसिक आरोग्यावरही परिणाम करू शकतो. त्यामुळे, मोबाईल फोन आणि सोशल मीडियाच्या वापराबाबत सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे.
झोपेकडे दुर्लक्ष – चांगली झोप शारीरिक थकवा दूर करण्यासाठीच नव्हे, तर मेंदूच्या सामान्य कार्यासाठीही अत्यंत आवश्यक आहे. सतत अपुरी झोप घेतल्यानं एकाग्रता साधणं, गोष्टी लक्षात ठेवणं आणि योग्य निर्णय घेणं यांसारख्या गोष्टींत अडचणी येऊ शकतात. झोपेच्या कमतरतेमुळे तणाव आणि चिंता यांसारख्या समस्या बळावू शकतात, तसंच मनस्थितीवरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, दररोज सुमारे सात ते नऊ तास चांगली आणि पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
सततचा नकारात्मक विचार – सतत स्वतःला दोष देणं, आपल्या उणिवांची सतत चिंता करणं किंवा प्रत्येक परिस्थितीतील नकारात्मक पैलूंवरच लक्ष केंद्रित करणं हे मानसिक आरोग्यासाठी हितकारक मानलं जात नाही. अशा मानसिकतेमुळे आत्मविश्वास आणि स्वतःबद्दलचा आदर हळूहळू कमी होऊ शकतो.
सततच्या नकारात्मक विचारांमुळे तणाव आणि चिंता वाढू शकते. त्यामुळे, आपल्या चुकांमधून शिकणं महत्त्वाचं असलं तरी, प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला दोष देण्याची सवय टाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे चांगल्या शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी वेळीच सवयी बदला.








