– बिडगाव–तरोडी खुर्द–पांढुर्णा नगरपंचायतीच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; २५ जणांचे रक्तदान, १५० नागरिकांची आरोग्य तपासनी.
कामठी :- शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत बिडगाव–तरोडी खुर्द–पांढुर्णा नगरपंचायतीच्या वतीने नगरपंचायत कार्यालयात आयोजित रक्तदान व महिला आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात २५ नागरिकांनी रक्तदान केले, तर तब्बल १५० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नगरपंचायतीच्या पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. नागरिकांना केवळ रक्तदानाचे आवाहन न करता स्वतः पुढाकार घेत रक्तदान केल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. याप्रसंगी नगराध्यक्ष वीरू जामगडे, उपाध्यक्ष निकेश कातुरे, बांधकाम सभापती संतोष तिजारे, पाणीपुरवठा सभापती प्रिया मल्लेवार, शिक्षण सभापती प्रीतम बोकडे आणि महिला व बालकल्याण सभापती भारतीताई देवगडे यांनी रक्तदान केले.
यावेळी नगरसेवक अजय बिसेन, चेतन तुरकर, नितीन चकोले, निकेत देवगडे, अजित जामगडे, नगरसेविका उषाताई चौधरी, ज्योत्स्ना घोनमोडे, सुप्रिया चकोले, जयश्री मेश्राम, तसेच आशिष मल्लेवार, गिरीधर देवगडे व पुंडलिक कुर्वेकर यांनीही रक्तदान केले.तसेच मुख्याधिकारी विनायक घुगे, उपमुख्याधिकारी रवींद्र बारापत्रे, लेखापाल गौरव देवतारे, लेखापरीक्षक गीतेश जुनघरे, बांधकाम अभियंता नीलेश बघमारे, पाणीपुरवठा अभियंता अश्विनी साठवणे, कर निरीक्षक सुशांत आरु, नगररचनाकार शाहरुख शेख, शहर समन्वयक भानुप्रिया रहांगडाले आणि प्रशासकीय अधिकारी देवानंद सावके यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही रक्तदान करून सहभाग नोंदविला.रक्तदानासोबतच महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे १५० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्यविषयक समस्या जाणून घेत आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने आरोग्य तपासणी उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला.रक्तदानाचे महत्त्व उल्लेखित करत नगरपंचायतीच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रक्तदान करून ‘रक्तदान करा आणि इतरांनाही प्रेरित करा’ असा संदेश दिला. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी यांनी एकत्रितपणे सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविल्याने नागरिकांमध्येही सामाजिक जबाबदारीची भावना दृढ करण्यास हातभार लागला.
पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रक्तदान व महिला आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. नगरपंचायतीच्या या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.








