spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘महाज्योती’-‘वनार्टी’च्या चाळणी परीक्षेतील तांत्रिक अडथळ्यांची चौकशी

– संबंधित केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र फेरपरीक्षा

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) आणि स्व. वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) यांच्या वतीने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा तसेच संयुक्त गट-ब व गट-क परीक्षा आणि लष्करातील सैनिक भरती परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता चाळणी परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल ९० हजार ६०० विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून, ३२ शहरांमध्ये ६४ परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी परीक्षेदरम्यान पुणे येथील आंबेगाव परिसरातील सन ब्राइट इंग्लिश मिडीयम स्कूल या परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

या तक्रारींची महाज्योती व वनार्टी प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करण्यात येणार आहे. संबंधित परीक्षा केंद्राचे केंद्र निरीक्षक, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संबंधित सहायक संचालक तसेच परीक्षा घेणाऱ्या संबंधित एजन्सीकडून घटनेबाबतचा सविस्तर अहवाल मागविण्यात येणार आहे. यासोबतच संबंधित परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येणार असून, उपलब्ध तांत्रिक नोंदी व परीक्षा प्रक्रियेचीही पडताळणी केली जाणार आहे. चौकशीअंती संबंधित प्रकरणात कोणाचीही दोषी भूमिका आढळल्यास नियमानुसार संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा देता न आलेल्या पात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी नोवा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, बिबेवाडी आणि जे. पी. ऑनलाइन एग्झाम सेंटर, वडगाव बुद्रुक, पुणे येथे घेण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र व वेळेबाबत आवश्यक सूचना देण्यात येतील. तसेच, नांदेड येथील मराठवाडा ऑनलाइन एग्झाम सेंटरवर दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी ज्ञानदीप शिक्षा प्रसारक मंडळ आणि अंजनगिरी कम्प्युटर बेस्ड सेंटर, अष्टविनायक नगर, नांदेड येथे घेण्यात येणार आहे. या प्रकरणाचीही आवश्यक माहिती व अहवाल प्राप्त करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना समान संधी, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ न देणे याला महाज्योती व वनार्टीचे सर्वोच्च प्राधान्य आहे. तांत्रिक अडचणी किंवा प्रशासकीय त्रुटींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.

Popular Articles