– शाळेच्या संचालक मंडळाच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश!
– गावाच्या शैक्षणिक प्रगतीत आणखी एक मानाचा तुरा!
– काट्याकुट्याच्या पायवाटेपासून ते एस.टी. बसेपर्यंतचा प्रवास!
किशोर साहू, मौदा :- २००० च्या दशकात ज्या शाळेत निसतखेडा व परिसरातील गावाच्या नागरिकांनी थंडीच्या कडाक्याच्या धुक्यात आणि पावसाळ्याच्या धो-धो पावसात, काटे-कुटे तुडवत, बांधाच्या धुरळ्यातून पायवाटेने चालत जाऊन शिक्षण पूर्ण केलं,
आज त्याच शाळेत जाणाऱ्या त्या नागरिकांच्या लेकरांना तो त्रास सहन करावा लागू नये, त्यांना चांगलं शिक्षण मिळावं आणि ये-जा सोपी व्हावी, या एकाच ध्येयाने निसतखेडा व परिसराच्या गावातील नागरिकांनी शाळेसाठी डांबरीरस्ता आणि एस.टी. महामंडळाची बस सेवा सुरू करण्यासाठी शाळेच्या संचालक मंडळाकडे, संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासन विभागाकडे सतत लेखी तक्रारी केले. शाळेच्या संचालक मंडळांनी संबंधित विभागाकडे याबाबत सतत पाठपुरावा केला. त्यांच्या सतत पाठपुराव्याला यश येऊन अखेर शनिवार (ता.१० ऑक्टोबर) पासून निसतखेडा व परिसराच्या गावातील विद्यार्थ्यांसाठी डांबरीरस्ते ही तयार झाले व बस सेवा सुरू झालेली आहे. सकाळी शाळेत जाण्यासाठी निलज( खंडाळा) – बोरी (सिंगारदीप)- नरसाळा- गांगनेर (हिवरा)- खंडाळा (गांगनेर)- निसतखेडा- खेडी – सालवा या मार्गाने तर सायंकाळी शाळा सुटल्यानंतर पुन्हा याच मार्गाने बस सेवा सुरू झालेली आहे.
या स्तूत उपक्रमाचे उद्घाटन निसतखेडा गावचे पोलिस पाटील प्रकाश महादुले यांच्या हस्ते व ग्रामपंचायत निसतखेडा सरपंच प्रज्ञा राहुल बावने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक बबन चव्हाण , गोविंद लोंडेकर, भोजराज बागडे , मनोज कामळी, मनीष कोसरे ,हर्षल मेश्राम, शाळेतील विद्यार्थी वर्ग सह गावातील बाल गोपाल मंडळी उपस्थित होते.
रस्त्यांचे डांबरीकरण व त्या डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर आता बस सेवा सुरू झाल्याने निसतखेडा व परिसराच्या गावातील नागरिकांनी सालवा येथील शाळेच्या संचालक मंडळासह, एसटी महामंडळाचे, संबंधित लोकप्रतिनिधी , शासनाच्या संबंधित प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचे व या प्रक्रियेला यश आणण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आहे.








