– दीक्षाभूमीच्या धर्तीवर कामठीच्या ड्रॅगन पॅलेस परिसरात उभारले जाताहेत भव्य वॉटरप्रूफ डोम
– ४० एकर विस्तीर्ण जागेत सपाटीकरणाचे काम युद्धपातळीवर ; पुस्तक स्टॉल्ससह मूलभूत सुविधांची जय्यत तयारी
– सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी घेतली ॲड. सुलेखा कुंभारे यांची भेट
– जागेची प्रत्यक्ष पाहणी करून व्यवस्थेचा घेतला आढावा
कामठी :- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर देश-विदेशातून लाखो भीमानुयायी दाखल होतात. दीक्षाभूमीला नतमस्तक झाल्यानंतर कामठी येथील विश्वविख्यात ‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल’ला भेट दिल्याशिवाय अनुयायी परत जात नाहीत, हा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग आणि प्रशासनाने दीक्षाभूमीसोबतच कामठीच्या ड्रॅगन पॅलेस येथेही अनुयायांच्या मुक्कामासाठी उत्तम निवासी व इतर सोईसुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी घेतली ॲड. सुलेखा कुंभारे यांची भेट
जागेची प्रत्यक्ष पाहणी करून व्यवस्थेचा घेतला आढावा
या नियोजनाचा भाग म्हणून सामाजिक कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी नुकतीच ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे भेट देऊन माजी राज्यमंत्री तथा ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख ॲड. सुलेखा कुंभारे यांची सदिच्छा भेट घेतली. या बैठकीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस येथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या तात्पुरत्या निवासी व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर तेलगोटे यांनी प्रत्यक्ष परिसराची पाहणी करून डोम उभारणी, स्वच्छता आणि आवश्यक सेवा-सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.
उघड्यावरील रात्र संपणार
ड्रॅगन पॅलेसमध्ये भव्य जर्मन डोम
दीक्षाभूमीवर यंदा प्रशासनाच्या वतीने २१ डोम उभारून हजारो अनुयायी व ५ हजार भिक्खूंच्या निवासाची व्यवस्था करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर कामठीच्या ड्रॅगन पॅलेस परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ अनुयायांच्या सोयीसाठी भव्य आधुनिक जर्मन वॉटरप्रूफ पेंडॉल (डोम) उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी मुक्कामी राहणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार असून त्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक निवारा मिळणार आहे.
४० एकर परिसराचे सपाटीकरण वेगात
ड्रॅगन पॅलेसचा परिसर सुमारे ४० एकर इतका विस्तीर्ण असल्याने येथे येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन संपूर्ण परिसरातील झाडे-झुडपे हटवून जेसीबीच्या साहाय्याने जमिनीचे लेव्हलिंग (सपाटीकरण) करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. परिसरातील रस्ते, मोकळी मैदाने आणि प्रवेशद्वार भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज करण्यात येत आहेत.
पुस्तकांचे स्टॉल्स व दुकानांसाठी स्वतंत्र नियोजन
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वैचारिक व आंबेडकरी साहित्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होते. हे लक्षात घेऊन ड्रॅगन पॅलेस परिसरात पुस्तक विक्रेते आणि इतर छोट्या व्यावसायिकांसाठी सुसज्ज दुकानांची व स्टॉल्सची आखणी करण्यात येत आहे. यामुळे अनुयायांना एकाच ठिकाणी ग्रंथसंपदा सहज उपलब्ध होईल आणि परिसरातील गर्दीचे नियोजनही सुलभ होईल.
आरोग्य, स्वच्छता आणि नशामुक्ती जनजागृतीवर भर दिला जाणार आहे.
अनुयायांच्या स्वागतासाठी व सेवेसाठी खालील व्यवस्था तैनात केल्या जात आहेत:
*पिण्याचे पाणी व स्वच्छता* : परिसरात फिरते (मोबाईल) शौचालये, नियमित स्वच्छता मोहीम आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची चोख सोय.
*आरोग्य व आपत्कालीन सेवा* : वैद्यकीय पथके, तात्पुरते आरोग्य केंद्र आणि रुग्णवाहिकांची चोवीस तास उपलब्धता.
*सामाजिक जनजागृती* : परिसरात प्रबोधनात्मक उपक्रम, नशामुक्ती प्रचार आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थापनावर विशेष भर.
“दीक्षाभूमीवर येणाऱ्या प्रत्येक अनुयायाची गैरसोय टाळण्यासाठी जशी डोम व निवासाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे ऐतिहासिक ड्रॅगन पॅलेसला भेट देणाऱ्या लाखो भाविकांना सर्व सोईसुविधा मिळाव्यात यासाठी शासन व प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे.”








