spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नवेगाव बांधच्या व्हॉलीबॉल संघांचा जिल्ह्यात डंका!

– तिन्ही गटांत प्रथम क्रमांक; नागपूर विभागीय स्पर्धेसाठी गोंदिया जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व!

– मुला-मुलींच्या घवघवीत यशाने नवेगाव बांधच्या शिरपेचात मानाचा तुरा!

पंकज परशुरामकर,नवेगाव बांध प्रतिनिधी :- ग्रामीण भागातील खेळाडूंच्या जिद्दीचा, चिकाटीचा आणि मेहनतीचा विजय! गोंदिया येथे ९ ऑक्टोबर २०२६ रोजी म्युनिसिपल हायस्कूल, रामनगर यांच्या आयोजनाखाली पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत नवेगाव बांध येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या तिन्ही संघांनी प्रथम क्रमांक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. १४ वर्षीय मुलांचा संघ, १४ वर्षीय मुलींचा संघ आणि १७ वर्षीय मुलांचा संघ अशा तिन्ही गटांनी विजेतेपद मिळवून शाळेसह संपूर्ण नवेगाव बांधचा नावलौकिक वाढविला.

तिन्ही गटांचा विजयाचा षटकार!

१४ वर्षीय मुले : आमगाव, सडक अर्जुनी व सालेकसा तालुक्यातील संघांना नमवत प्रथम क्रमांक.

१४ वर्षीय मुली : आमगाव, सडक अर्जुनी व तिरोडा तालुक्यातील संघांवर मात करत विजेतेपद.

१७ वर्षीय मुले : आमगाव, देवरी व गोंदिया तालुक्यातील संघांना पराभूत करून प्रथम स्थान.

आता लक्ष्य नागपूर विभागीय स्पर्धा!

जिल्हास्तरीय स्पर्धेतील या दैदिप्यमान यशानंतर तिन्ही संघांची नागपूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १४ वर्षीय मुले व मुलींचे संघ १२ ऑक्टोबर रोजी, तर १७ वर्षीय मुलांचा संघ १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रघुजीनगर, नागपूर येथे गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

विशेष म्हणजे, १७ वर्षीय मुलांच्या संघाने मागील दोन वर्षांपासून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविण्याची परंपरा कायम राखली आहे. १४ वर्षीय मुलींच्या संघानेही मागील दोन वर्षांपासून जिल्हास्तरावर प्रथम स्थान मिळविले असून, सडक अर्जुनी येथील आमदार चषक स्पर्धेतही विजेतेपद पटकावले आहे.

यशामागे शिक्षकांचे अथक परिश्रम!

या यशात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. रचनाताई गहाणे, उपाध्यक्ष होमराज पुस्तोडे, प्राचार्य संजय जाधव आणि क्रीडा शिक्षक डायाभाई शेंडे यांचे मोलाचे योगदान आहे. विद्यार्थ्यांना वर्षभर सराव, योग्य मार्गदर्शन आणि शिस्तीचे धडे देत घडविण्यासाठी शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फलित आहे.

या विजयाबद्दल नवेगाव बांधचे उद्योजक अमृतलालजी टांक, नितीनभाऊ पुगलिया,शैलेश जायस्वाल, दिलीप शिपाणी,विजय डोये, रामदास बोरकर, संजीव बडोले, एकनाथ बोरकर,सचिन ठाकरे, दीपक क्षीरसागर, राहुल नरूले, अजय बडोले, सागर राऊत, सुवाणंद सोनटक्के, धीरज नेवारे, वीरेंद्र येरणे, पंकज साखरे, यांनी विजयी खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले. तसेच नागपूर विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण प्रतिभेचा गौरव; नवेगाव बांधचा अभिमान!

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही उत्कृष्ट क्रीडागुण आहेत, हे या खेळाडूंनी सिद्ध करून दाखविले आहे. वर्षभराचा सराव, जिंकण्याची जिद्द, संघभावना आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांच्या बळावर जिल्हा परिषद हायस्कूलच्या संघांनी यशाचे नवे शिखर गाठले आहे.

तिन्ही संघांचे यश म्हणजे नवेगाव बांधच्या क्रीडा क्षेत्रातील अभिमानास्पद पर्व! आता नागपूर विभागीय स्पर्धेतही विजयाची पताका फडकविण्यासाठी संपूर्ण नवेगाव बांधकडून खेळाडूंना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Popular Articles