वाडी, ग्रामीण प्रतिनिधी :- पीएम श्री केंद्रीय विद्यालय, अंबाझरी, नागपूर येथे वार्षिक पॅनेल निरीक्षण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. मुंबई विभागाच्या सहायक आयुक्त प्रभा मिंज यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या निरीक्षण पथकाचे विद्यालय परिवाराच्या वतीने आत्मीय स्वागत करण्यात आले.
निरीक्षणादरम्यान सहायक आयुक्त प्रभा मिंज यांच्या हस्ते विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनात त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शिक्षकांच्या समर्पित कार्याचे कौतुक केले. तसेच सर्वांनी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि समर्पित कार्यशैली यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. विद्यालयाचे प्राचार्य अनिल कुमार यांनी निरीक्षण पथकाचे आभार मानले. तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पीजीटी (हिंदी) शिक्षिका वीणा मिश्रा यांनी केले. या उपक्रमामुळे विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह व ऊर्जा निर्माण झाली.








