– १२ हजार चौरस फुटांच्या डोममध्ये अडीच हजार वर्षांचा बौद्ध इतिहास; शासकीय अनुदानाशिवाय युवा समूहाचा अभिनव उपक्रम
नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीचा वारसा जपणाऱ्या नागपूरच्या बुद्ध नगरातील बुद्ध पार्क येथे नागपूर बुद्धिस्ट कॉन्सोर्टियम (NBC) या युवा समूहाने साकारलेला महाबोधी महाविहाराचा भव्य देखावा नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. ५६ फूट उंच आणि सुमारे १२० फूट लांबीच्या महाबोधी महाविहाराच्या प्रतिकृतीसह १२ हजार चौरस फुटांच्या भव्य डोममध्ये अडीच हजार वर्षांचा बौद्ध इतिहास, धम्मविचार आणि सामाजिक परिवर्तनाचा प्रवास उलगडण्यात आला आहे. हा देखावा १३ ते २२ ऑक्टोबरदरम्यान नागरिकांना पाहता येणार असून, प्रदर्शनाची वेळ सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत आहे. या प्रदर्शनात सम्राट अशोकाचे कलिंग युद्धानंतर झालेले हृदयपरिवर्तन, अहिंसा आणि धम्माचा प्रसार, प्राचीन नालंदा विद्यापीठाचा ज्ञानवारसा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक योगदान, भारतीय संविधान आणि राष्ट्रध्वजातील अशोकचक्राचे महत्त्व यांची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. डोंगेश्वरी पर्वताचे प्रतिरूप आणि बोधगया येथील तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीवर आधारित प्रतिकृती ही प्रदर्शनाची प्रमुख आकर्षणे आहेत.
सामाजिक परिवर्तनाचा प्रेरणादायी संदेश
प्रदर्शनात एका बाजूला अस्पृश्यता, सामाजिक विषमता आणि शिक्षणापासून वंचित राहण्याची ऐतिहासिक परिस्थिती, तर दुसऱ्या बाजूला शिक्षण, रोजगार, प्रशासकीय सेवा, उद्योग आणि व्यावसायिक प्रगतीच्या माध्यमातून घडलेले परिवर्तन दर्शविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षण, संघटन आणि संघर्षाचा संदेश तसेच १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर झालेली ऐतिहासिक धम्मदीक्षा या परिवर्तनाच्या प्रवासाचे महत्त्वाचे टप्पे म्हणून अधोरेखित करण्यात आले आहेत.
शासकीय अनुदानाशिवाय युवा शक्तीचा आविष्कार
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे आयोजकांच्या माहितीनुसार, कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय युवा कार्यकर्त्यांनी वर्गणी, श्रमदान आणि सामूहिक प्रयत्नांतून हा भव्य देखावा उभारला आहे. प्रामुख्याने २० ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणांनी नियोजन, कलात्मक प्रतिकृती, डोम आणि दृश्यात्मक मांडणीच्या माध्यमातून हा उपक्रम साकारला आहे. इतिहासाचे जतन, बौद्ध विचारांचा प्रसार आणि सामाजिक प्रबोधन हे या प्रदर्शनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
नागपूरला दीक्षाभूमीमुळे भारतीय बौद्ध चळवळीच्या इतिहासात विशेष स्थान आहे. अशा शहरात बौद्ध इतिहास आणि सामाजिक परिवर्तनाची ओळख नव्या पिढीला करून देणारा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. विद्यार्थी, तरुण, कुटुंबे आणि बौद्ध इतिहासात रस असलेल्या नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
[ प्रदर्शनाचे स्थळ : बुद्ध नगर, बुद्ध पार्क, नागपूर वेळ : सकाळी ९ ते रात्री १२
आयोजक :नागपूर बुद्धिस्ट कॉन्सोर्टियम (NBC) संपर्क :९८२३८ ८४५६७]
आयोजक मंडळ : राकेश धारगावे, छोटू खांडेकर, मिथिलेश गाणार, अश्विन गणवीर, अश्विनी गजभिये, देवाभाऊ उमरे आणि अमित वांद्रे परिश्रम घेत आहेत.








