spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मौदा शहरात ठिकठिकाणी उघड्या MSEB च्या DP देत आहे अपघाताला निमंत्रण…

– डीपीचे दार उघडे, वायर्स बाहेर; परिसरात कचरा आणि झुडपांचे साम्राज्य, विद्युत विभागाचे दुर्लक्ष

मौदा :- शहरातील वार्ड क्रमांक सहामध्ये तसेच अनेक ठिकाणी विद्युत वितरण यंत्रणेच्या डीपीची दुरवस्था नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डीपीचे दार उघडे असून, आतील विद्युत तारा बाहेर आलेल्या आहेत. परिसरात कचरा आणि हिरवळीच्या झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. या डीपीच्या परिसरातून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. त्यामुळे संभाव्य विद्युत अपघाताचा धोका निर्माण झाला असूनही विद्युत विभागाला जाग कधी येणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

वार्ड क्रमांक सहामधील ही डीपी वर्दळीच्या ठिकाणी असून, परिसरात लहान मुले खेळत असतात. डीपीचे दार उघडे असल्याने तसेच विद्युत तारा बाहेर लोंबकळत असल्याने एखाद्या निष्काळजीपणामुळे गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यानंतर परिसरात वाढलेली झुडपे आणि साचलेला कचरा यामुळे या ठिकाणची अस्वच्छता अधिकच वाढली आहे. विद्युत यंत्रणेच्या देखभालीसोबतच परिसराच्या स्वच्छतेकडेही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वारंवार माहिती देऊनही उपाययोजना नाहीत?

या समस्येबाबत संबंधित विभागाला वारंवार माहिती देण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, डीपीच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना झाल्या नसल्याची तक्रार आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर दुरुस्तीचे काम करतानाही या परिसरातील कचरा आणि झुडपांमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे.

दुर्घटना घडण्याची वाट पाहणार का?

विद्युत विभागाने डीपीचे उघडे दार तातडीने बंद करून सुरक्षित कुलूपबंद व्यवस्था करावी, बाहेर आलेल्या विद्युत तारा व्यवस्थित बसवाव्यात आणि परिसरातील कचरा व झुडपे हटवावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. लहान मुले आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना संबंधित विभागाने आणखी किती काळ दुर्लक्ष करायचे? एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी विद्युत विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे..

  MSEB चे अधिकारी झोपेचे सोंग करतात

मी या खुल्या DP बॉक्स बाबत वारंवार माहिती दिली असुन सुद्धा MSEB चे अधिकारी झोपेचे सोंग करतात. या परिसरात लहान मुले खेळत असतात, अशा परिस्थितीत एखाद्या मुलाचा किंवा नागरिकाचा विद्युत प्रवाहाच्या संपर्कात येऊन अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण,

वीज ही अत्यंत धोकादायक बाब असून, विद्युत वितरण यंत्रणेतील उघडे बॉक्स नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करू शकतात. विशेषतः लहान मुलांना विजेच्या धोक्याची पुरेशी जाणीव नसल्याने अशा ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मौदा शहरातील अशा धोकादायक ठिकाणांची पाहणी करून उघडे DP बॉक्स तातडीने बंद करावेत, आवश्यक सुरक्षा कुलूप व संरक्षक व्यवस्था करावी, तसेच परिसरातील झाडेझुडपे आणि कचरा कापुन परिसर स्वच्छ ठेवावे,भविष्यात कोणतीही जीवितहानी किंवा दुर्घटना घडू नये, यासाठी संबंधित MSEB चे अधिकारी आणि प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा दुर्घटना घडण्यापूर्वीच खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. MSEB विभागाने या समस्येकडे दुर्लक्ष न करता नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अन्यथा मौदा शहरातील नागरिकांना किंवा लहानमुलांना अशा खुल्या बॉक्स मुडे विजेचा धक्का लागला तर त्याला सर्वस्वी MSEB चे अधिकारीच जिम्मेदार राहणार व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या सर्व अधिकाऱ्यांवर दाखल करू…

दामिनी विक्की साठवणे  नगरसेविका नगरपंचायत मौदा..

Popular Articles