हंसराज,भंडारा कारधा :- कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंशाची अत्यंत निर्दयपणे व बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी छापा टाकून ५ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून बोलेरो पिकअप (क्र. MH-33-T-1777) अडवून तपासणी केली असता, वाहनात चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता अत्यंत अमानुषपणे कोंबलेली ३ गायी, ३ गोऱ्हे व १ बैल अशी एकूण ३३ हजार रुपयांची ७ जनावरे आढळून आली. पोलिसांनी ५ लाख रुपयांच्या वाहनासह सर्व जनावरे पंचांसमक्ष जप्त करून मुक्या प्राण्यांची सुटका केली.
या प्रकरणी पिकअप चालक आरोपी नेपाल दिलीप हटवादे (वय ३३ वर्षे, रा. बरडकिन्ही, ता. साकोली, जि. भंडारा) याच्याविरुद्ध फिर्यादी पोहवा. गायधने यांच्या तक्रारीवरून कारधा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७६३/२०२६ अन्वये प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६० चे कलम ११ (१) (अ), (ड), (ई), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ चे सहकलम ९ आणि भारतीय न्याय संहिता, २०२३ (BNS) चे कलम ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची यशस्वी धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार गायधने व पोलीस हवालदार सिडाम यांनी केली असून पुढील तपास कारधा पोलीस करीत आहेत.








