– त्रिमूर्ती चौकातील डॉ. आंबेडकर स्मारकात अशोक विजयादशमीनिमित्त कार्यक्रम
हंसराज,भंडारा :- अशोक विजयादशमीचे औचित्य साधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे त्रिमूर्ती चौक, भंडारा येथे २० ऑक्टोबर २०२६ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समितीचे अध्यक्ष महादेव मेश्राम यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे, रामकुमार गजभिये, अमृत बन्सोड, इंदिरा सतदेवे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकास माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर अगरबत्ती व मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली. उपस्थितांनी सामूहिकरीत्या त्रिसरण व पंचशील ग्रहण केले. समितीतर्फे मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना रामकुमार गजभिये यांनी, आज जगाला युद्धाची नव्हे, तर बुद्धाची आणि त्यांच्या समतेच्या विचारांची गरज असल्याचे सांगितले. आशु गोंडाणे यांनी उपस्थितांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार संघटित होऊन न्याय व हक्कांसाठी संघर्ष करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. अमृत बन्सोड यांनी धम्माविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. बुद्धांचा धम्म मानवाच्या कल्याणासाठी कसा महत्त्वाचा आहे, याबाबत त्यांनी विस्तृत माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात महादेव मेश्राम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणाचा तसेच त्यांनी केलेल्या महान कार्याचा आढावा घेतला. समितीला नेहमी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी उपस्थित पाहुण्यांना केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना असित बागडे यांनी केली. संचालन समितीचे कोषाध्यक्ष महेंद्र वाहाणे यांनी, तर आभारप्रदर्शन समितीचे सहसचिव टी. के. नंदागवळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समितीच्या सहसचिव निर्मला गोस्वामी, बी. सी. गजभिये, हर्षल मेश्राम, सुनील धारगावे, यशवंत नंदेश्वर, एम. आर. राऊत, आर. बी. तांगडे, मदन बागडे, रवी भांडारकर आदींनी सहकार्य केले.







