spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अल्पवयीन मुलीशी छेडछाड, लुटीप्रकरणी दोन आरोपींना तीन वर्षांचा कारावास

– कामठीतील खैरी-वारेगाव मार्गावरील प्रकरणाचा न्यायालयीन निकाल; प्रत्येकी सहा हजार रुपयांचा दंड

कामठी :- अल्पवयीन मुलीशी छेडछाड करून तिच्या मित्राकडील दोन हजार रुपये हिसकावून घेतल्याप्रकरणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोन आरोपींना दोषी ठरवत तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अतुल अशोक मोडककर आणि धर्मराज लक्ष्मण थोरवे अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने विविध कलमांनुसार शिक्षा सुनावत दोन्ही आरोपींना प्रत्येकी सहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला

प्राप्त माहितीनुसार, १४ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी २ ते २.३० वाजताच्या सुमारास कामठी तालुक्यातील खैरी-वारेगाव मार्गावर ही घटना घडली होती. आरोपींनी एका अल्पवयीन मुलीला आणि तिच्या मित्राला अडवून मुलीच्या मित्राकडील दोन हजार रुपये हिसकावून घेतले. यावेळी अल्पवयीन मुलीशी छेडछाड केल्याचीही तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी कुणाल ज्ञानेश्वर मंगळवार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप शहाजी थोरवे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यांनी तपास पूर्ण करून आरोपींविरुद्ध जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. तपासादरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनीष हिवरकर यांनी सहकार्य केले. अभियोजन पक्षाच्या कामकाजात हवालदार ज्ञानेश्वर गायकवाड यांनी मदत केली.

न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३९२ अंतर्गत तीन वर्षांचा कारावास व दोन हजार रुपये दंड, कलम ३५४ अंतर्गत एक वर्षाचा कारावास व दोन हजार रुपये दंड, तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८ अंतर्गत तीन वर्षांचा कारावास व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. परिणामी, प्रत्येक आरोपीला एकूण सहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

Popular Articles