spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिल्हा परिषदेच्या लेकींनी मोठ्या शाळांनाही दाखवली आपली ताकद!”

– रचना गहाणे यांच्याकडून सुवर्णकन्यांचे कौतुक; नागपूर विभागावर विजय मिळवत नवेगाव बांधच्या मुलींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झेप

नवेगाव बांध प्रतिनिधी :- “जिल्हा परिषद शाळेच्या मुली कोणत्याही बाबतीत कमी नाहीत, हे नवेगाव बांधच्या विद्यार्थिनींनी आपल्या खेळातून सिद्ध करून दाखवले आहे. मोठ्या नावाजलेल्या शाळांना जे यश मिळवता आले नाही, ते झोलबा पाटलाच्या वाड्यातील आपल्या ग्रामीण भागातील मुलींनी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मिळवून दाखवले. गावाचे आणि जिल्ह्याचे नाव नागपूर विभागात उज्ज्वल करणाऱ्या या सुवर्णकन्यांचा आम्हाला अभिमान आहे,” असे गौरवोद्गार जिल्हा परिषद सदस्या तथा शाळा समितीच्या अध्यक्षा रचना गहाणे यांनी काढले.

नागपूरच्या रघुजीनगर येथे झालेल्या नागपूर विभागीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत नवेगाव बांध येथील जिल्हा परिषद शाळेच्या १४ वर्षीय मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात नागपूर शहराच्या संघाचा २५-१५, २५-९ असा सरळ सेटमध्ये पराभव करून या मुलींनी ऐतिहासिक यश संपादन केले. या विजयामुळे संघाची खरवते-दहिवली ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथे 28 आक्तोबर 2026 रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या उल्लेखनीय यशानंतर रचनाताई गहाणे यांनी विजयी खेळाडूंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींच्या मेहनतीचे कौतुक करत ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास त्या राज्यस्तरावरही चमकू शकतात, असा विश्वास व्यक्त केला. या मुलींच्या यशामुळे इतर विद्यार्थिनींनाही क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल, असेही त्या म्हणाल्या.

स्पर्धेत नवेगाव बांधच्या संघाने वर्धा जिल्ह्याच्या संघाचा २-० असा पराभव केला, तर उपांत्य फेरीत नागपूर ग्रामीणच्या संघावर २-१ अशी मात केली. अंतिम सामन्यातही दमदार खेळाचे प्रदर्शन करत नागपूर शहराला पराभूत केले. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील या संघाने विभागीय स्तरावर मिळवलेल्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

विजयी संघातील खेळाडू : रक्षा सोनटक्के, दिव्या डोये, रितिका नैताम, जोया पठाण, जानवी कोवे, सोनाक्षी कुंभरे, अमृता सोनटक्के, गौरी कंगाले, पलक राऊत, कीर्ती ब्राम्हणकर, अंजली जांभुळकर आणि प्रणिता डोंगरे.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय डोये, प्राचार्य संजय जाधव आणि क्रीडा शिक्षक डायाभाई शेंडे उपस्थित होते. ग्रामीण भागातील या मुलींनी मिळवलेले यश नवेगाव बांध गावासह संपूर्ण भंडारा-गोंदिया जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरले आहे. आता राज्यस्तरीय स्पर्धेतही या सुवर्णकन्या आपली चमक दाखवतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Popular Articles