spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नवेगाव बांध येथे पोलीस स्मृती दिन; शहीद दीपक रहिले यांना श्रद्धांजली

पंकज परशुरामकर, नवेगाव बांध :– पोलीस स्मृती दिनानिमित्त २१ ऑक्टोबर रोजी नवेगाव बांध येथे नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस उपनिरीक्षक दीपक रहिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. २० जानेवारी २००३ रोजी देवरी तालुक्यातील सिंगनडोह येथे नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या सुरुंगस्फोटात दीपक रहिले यांना वीरमरण आले होते. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस हुतात्म्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

पोलीस ठाणे नवेगाव बांध तसेच जिल्हा परिषद हायस्कूल व कला-विज्ञान महाविद्यालय, नवेगाव बांध येथे सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजित पाटील, पोलीस अधिकारी व अंमलदार, गावातील प्रतिष्ठित नागरिक, नितीन पुगलिया, अमृतलाल टाक, मुलचंद गुप्ता, हरिश्चंद्र चांदेवार, पोलीस पाटील विजया खंडाईत, शाळेतील शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी शहीद दीपक रहिले यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या शौर्याचे स्मरण केले.

या कार्यक्रमात शहीद पोलीस उपनिरीक्षक दीपक रहिले यांच्या भगिनी थेर यांनी आपल्या भावाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करताना त्यांनी भावाच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. कर्तव्यनिष्ठा आणि जनतेच्या सुरक्षेसाठी प्राणांची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या पोलीस जवानांचा त्याग समाजासाठी सदैव प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली. पोलीस स्मृती दिनाच्या निमित्ताने शहीद जवानांच्या बलिदानाप्रती आदर व्यक्त करीत त्यांचे स्मरण करण्यात आले.

Popular Articles