किशोर साहू, मौदा :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा, घोटमुंढरी पंचायत समिती, मौदा येथे उपासिका रुमी (बुक्क्यो डेंडो क्योकाई, टोकियो, जपान), भंते डॉ. चंद्रकीर्ती (विभागप्रमुख, स्वामी विवेकानंद सुभारती विद्यापीठ, मेरठ, उत्तर प्रदेश), डॉ. निरज पुरी (जपानी भाषा अनुवादक) आणि शिक्षक पुरुषोत्तम शहरे (मुजबी, जिल्हा भंडारा) यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना जपानी भाषा, संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक मूल्यांची ओळख करून घेण्याची अनोखी संधी मिळाली.
या भेटीदरम्यान उपासिका रुमी यांनी विद्यार्थ्यांशी जपानी भाषेत संवाद साधला. जपानी भाषेतील संवाद विद्यार्थ्यांना समजावा यासाठी डॉ. पुरी यांनी अनुवादकाची भूमिका पार पाडली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाहुण्यांचे विचार आणि मार्गदर्शन समजून घेता आले. या संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये परदेशी भाषा आणि संस्कृतीविषयी कुतूहल निर्माण झाले.
यावेळी जपानी संस्कृती, जपानी लोकांची शिस्त, एकमेकांशी आदरपूर्वक वागण्याची पद्धत, परस्पर सहकार्य, नम्रता आणि दैनंदिन जीवनातील शिष्टाचार यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. जपानी समाजातील शिस्तप्रियता, वेळेचे महत्त्व आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या मूल्यांची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली.
या प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले. पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानाची व्याप्ती वाढावी आणि अभ्यासाची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश होता.
शाळेतील विद्यार्थ्यांची शिस्त, शैक्षणिक गुणवत्ता, शिकण्याची आवड आणि शिक्षकांचे विद्यार्थ्यांप्रती असलेले समर्पण पाहून उपस्थित पाहुण्यांनी भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेतील शिक्षक करीत असलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी विशेष अभिनंदन केले.
या भेटीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उपासिका रुमी यांनी शाळेच्या व्हिजिट रजिस्टरमध्ये जपानी भाषेत आपले मनोगत व्यक्त करून भेटीच्या आठवणी नोंदविल्या. शाळेसाठी हा क्षण विशेष आनंदाचा आणि अभिमानाचा ठरला
यावेळी केंद्रप्रमुख इंद्रायणी थुलकर,शाळेचे मुख्याध्यापक विकास धारगावे, ग्रा प सदस्य मोसमी घरडे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक सुदेन्दु सुखदेव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शाळेतील इतर शिक्षकवृंद मच्छिंद्र कांबळे,द्रोवीना कुळसुंगे, मनोज वंजारी, गोपाल मेळे, सिनगारे, मोनाली पटले, कु. शुल्का ढोरे तसेच आम्रपाली घरडे या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सदिच्छा भेटींमुळे विद्यार्थ्यांना विविध देशांच्या भाषा, संस्कृती आणि जीवनमूल्यांची माहिती मिळते. विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन व्यापक होण्यास, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होण्यास आणि जागतिक स्तरावरील ज्ञानाची ओळख होण्यास मदत होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा, घोटमुंढरी येथे आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरला.








