– आठ मतदान केंद्रांवर ४,६५१ पैकी ३,१४९ मतदारांनी बजावला हक्क; ३८ उमेदवारांच्या भवितव्याकडे लक्ष
कामठी :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज शुक्रवारी 23 ऑक्टोबर ला सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत कामठी तालुक्यातील आठ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. कोराडी, कामठी तहसील कार्यालय व पंचायत समिती कामठी या आठ मतदान केंद्रांवर एकूण ६७.७१ टक्के मतदानाची नोंद झाली. एकूण ४ हजार ६५१ नोंदणीकृत मतदारांपैकी ३ हजार १४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अशी माहिती कामठीचे तहसीलदार गणेश जगदाडे यांनी दिली.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ३८ उमेदवार रिंगणात असून त्यांचे विजयाचे भवितव्य मतदानातून आज सीलबंद झाले असून , त्यांच्या भवितव्याचा फैसला 27 ऑक्टोबर ला होणाऱ्या मतमोजणीनंतर होणार आहे. कामठी तालुक्यातील मतदान प्रक्रियेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. निर्धारित वेळेत पार पडलेल्या मतदानात पुरुषांसह महिला पदवीधर मतदारांनीही सहभाग नोंदवला.

मतदान केंद्रनिहाय आकडेवारीनुसार, कोराडी येथील मतदान केंद्र क्रमांक ३३ वर सर्वाधिक ८२.७७ टक्के मतदान झाले. या केंद्रावर ३५४ मतदारांपैकी २९३ मतदारांनी मतदान केले. कामठी येथील केंद्र क्रमांक ३५ वर ६०७ पैकी ४५२ मतदारांनी मतदान केले असून, येथे ७४.४६ टक्के मतदानाची नोंद झाली. कोराडी येथील केंद्र क्रमांक ३४ वर ५४६ पैकी ४०२ मतदारांनी मतदान केल्याने मतदानाची टक्केवारी ७३.६३ राहिली.
कामठीतील केंद्र क्रमांक ३८ वर ६५१ पैकी ४५७ मतदारांनी मतदान केले. येथे ७०.२० टक्के मतदान झाले. केंद्र क्रमांक ३६ वर ६६.५१ टक्के, केंद्र क्रमांक ३७ वर ६५.०४ टक्के आणि केंद्र क्रमांक ३९ वर ६२.८२ टक्के मतदानाची नोंद झाली. कामठीतील केंद्र क्रमांक ४० वर ६१९ पैकी ३३१ मतदारांनी मतदान केले असून, येथे ५३.४७ टक्के मतदान झाले.
तालुक्यातील आठ मतदान केंद्रांवर २ हजार ३७१ पुरुष आणि २ हजार २८० महिला मतदारांची नोंदणी होती. त्यापैकी १ हजार ६५५ पुरुष आणि १ हजार ४९४ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणाऱ्या पुरुषांची संख्या महिलांपेक्षा १६१ ने अधिक राहिली.
एकूण नोंदणीकृत मतदारांपैकी १ हजार ५०२ मतदारांनी मतदान केले नाही. त्यामुळे तालुक्यात ६७.७१ टक्के मतदानाची नोंद झाली असून, उर्वरित मतदार मतदान प्रक्रियेपासून दूर राहिले.
-३८ उमेदवारांच्या निकालाकडे लक्ष
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ३८ उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी नोंदवलेल्या कौलावर अवलंबून आहे. कामठी तालुक्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मतदारांचा अंतिम कौल कोणाच्या बाजूने राहिला, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.








