– अण्णाभाऊ साठे चौकात नगरपरिषदेविरोधात निदर्शने; दुचाकीस्वारांना मास्क वाटप
हंसराज, भंडारा :- शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे उडणाऱ्या धुळीच्या प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आज अण्णाभाऊ साठे चौकात नगरपरिषद प्रशासनाविरोधात निदर्शने व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धुळीपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी चौकातून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना मास्कचे वाटपही करण्यात आले.
शहरातील अंतर्गत रस्त्यांची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. विकासकामांसाठी रस्ते खोदण्यात आले, मात्र ते कायमस्वरूपी पद्धतीने बुजवण्यात आले नाहीत, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. खड्डे बुजवण्यासाठी गिट्टी व चुरी टाकण्यात आली, पण काही दिवसांतच ती निघून जाऊन खड्डे पुन्हा पूर्वीसारखे झाले, असे त्यांनी सांगितले. जड वाहन गेल्यावर धुळीचे लोट उठतात आणि त्याचा त्रास दुचाकीस्वार, सायकलस्वार व पादचाऱ्यांना होतो, असेही पक्षाकडून सांगण्यात आले. खड्ड्यांमुळे अपघात होत असून काही नागरिकांना कायमचे अपंगत्व आले आहे, तसेच मणक्याचे आणि श्वसनाचे आजार वाढत असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला.
पक्षाच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी नगरपरिषद प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या, मात्र त्यावर कार्यवाही झाली नाही. मागील नगरपरिषद निवडणुकीदरम्यान सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी प्रचारात दिलेल्या आश्वासनांचाही उल्लेख पदाधिकाऱ्यांनी केला. नगरपरिषदेत सत्ता स्थापन होऊन जवळपास एक वर्ष होत आले, तरी रस्त्यांची स्थिती सुधारलेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
पदाधिकाऱ्यांनी मिस्कीन टँक ते पांडे महल, अण्णाभाऊ साठे चौक ते संताजी मंगल कार्यालय, राजीव गांधी चौक ते खात रोडदरम्यान ट्यूशन गल्ली, चांदणी चौक ते संताजी वॉर्ड, तसेच मिस्कीन टँक ते पोस्ट ऑफिस चौक या रस्त्यांवर मोठे खड्डे असल्याचे नमूद केले.
जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी केली. मास्क वाटपानंतर पदाधिकाऱ्यांनी चौकात ठाण मांडून रास्ता रोको केला. त्यानंतर उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन भंडारा पोलीस ठाण्यात नेले.
आंदोलनात जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे , शहर प्रमुख राकेश आग्रे, शहर संघटक प्रशांत देशमुख व मयूर जोशी, शहर समन्वयक ईश्वर टाले, उपशहर प्रमुख प्रकाश गभणे, विभाग प्रमुख अनिरुद्ध गाढवे, नितेश गभणे, यश पारधी, चित्रगंध सेलोकर, सोमेश्वर सेलोकर, हर्षल टेंभुर्णे, संतोष चांदेवार, योगेश पवनकर, राज वधवाणी, विश्वजीत पंडा, निलेश चामट, हिमांशू भाजीपाले, शामराव मालखंडाळे, मोनू हेडाऊ, अमित हटवार, नदीम शेख, जितेंद्र बोरकर, वेदांत गिरेपुंजे, प्रकाश निनावे, रोशन मेश्राम, मृणाल शामकुवर, वैभव मेश्राम, निशांत बाकोडे, नाना मते, सतीश धुर्वे, रामू लांजेवार, मीताराम जीभकाटे, प्रणय हरकंडे, धर्मेंद्र ढोमणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.








