– आशा हॉस्पिटलजवळ पोलिसांची धडक कारवाई; १ लाख ११ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, एक आरोपी अटकेत तर दोघांचा शोध सुरू
कामठी :- नवीन कामठी पोलिसांनी अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात धडक कारवाई करीत ५ किलो ८४ ग्रॅम गांजासदृश अमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत एकूण १ लाख ११ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे कामठी परिसरातील अवैध अमली पदार्थांच्या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, नवीन कामठी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ३१ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास आशा हॉस्पिटलजवळ, कामठी येथील ऑटोमोटिव्ह चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कारवाई केली. या कारवाईदरम्यान संशयित मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक अन्सारी (वय २६, रा. बुनकर कॉलनी, दवाखान्याजवळ, कामठी) याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी त्याच्याकडून ५ किलो ८४ ग्रॅम वजनाचा गांजासदृश अमली पदार्थ जप्त केला. या अमली पदार्थाची किंमत १ लाख १ हजार ६८० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय वनप्लस कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल फोन, किंमत १० हजार रुपये, तसेच रेल्वेचे तिकीट असा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला. अशा प्रकारे एकूण १ लाख ११ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.
अमली पदार्थांचा पुरवठा ओडिशातून झाल्याची माहिती
प्राथमिक तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीने सदर अमली पदार्थ ओडिशा येथून खरेदी करून आणल्याचे सांगितल्याची माहिती पोलीस प्रेस नोटमध्ये देण्यात आली आहे. या प्रकरणात फैजान अन्सारी फिरोज अन्सारी (वय २७, रा. गोल बाजार, जुनी कामठी) याच्यासह शादाब नावाच्या अन्य एका व्यक्तीचा सहभाग असल्याची माहिती समोर आली असून, संबंधित दोघांचा शोध सुरू आहे. अमली पदार्थांचा पुरवठा आणि वितरणाच्या साखळीचा शोध घेण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणी एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त विनिता साहू, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक ६ रमेश धुमाळ आणि सहायक पोलीस आयुक्त जरीपटका विभाग तथा कामठी विभागाचे अतिरिक्त प्रभारी सत्यवीरकुमार बंडिवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रामेश्वर कायंदे, पोलीस उपनिरीक्षक योगेश नाल्टे, सहायक फौजदार किशोर महंत, पोलीस हवालदार विवेक दोरसेटवार, सुरज ठाकूर, आशिष बागडे आणि पोलीस अंमलदार तुषार मोरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.








