spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडाऱ्यात अस्थायी सफाई कामगारांचे वैनगंगेत ‘जलसमाधी’ आंदोलन!

– ४५ दिवसांच्या उपोषणानंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष; ५९ कामगार थेट नदीपात्रात उतरल्याने खळबळ

हंसराज,भंडारा :- शहरातील रस्ते, गल्लीबोळ स्वच्छ ठेवून नागरिकांचे आरोग्य सांभाळणाऱ्या भंडारा नगरपरिषदेच्या अस्थायी सफाई कामगारांवर आज थेट नदीपात्रात उतरून जीवाची बाजी लावण्याची वेळ आली आहे. मागील दीड महिन्यापासून (४५ दिवस) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या ५९ कामगारांनी आज परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्वात वैनगंगा नदीत उतरून ‘जलसमाधी’ आंदोलन पुकारले. मागण्या मान्य न झाल्यास नदीत उड्या मारून जीवन संपवू, असा आक्रमक पवित्रा या कामगारांनी घेतल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे.

भंडारा नगरपरिषदेच्या हद्दीत कचरा संकलन आणि स्वच्छतेचे काम करणाऱ्या ५९ अस्थायी कामगारांना महिन्याभरापूर्वी कंत्राटदाराने अचानक कामावरून कमी केले. वर्षानुवर्षे शहराची घाण साफ करणाऱ्या या कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला.

कंत्राटदाराने त्यांना तातडीने पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे आणि पालिकेने या कामगारांच्या सेवेची दखल घेऊन त्यांना सेवेत कायमस्वरूपी करावे, या प्रमुख मागण्यांसाठी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ४५ दिवस शांततेच्या मार्गाने उपोषण केले.

मात्र, शासन आणि पालिकेच्या ढिम्म प्रशासनाने या उपोषणाची साधी दखलही घेतली नाही. अखेर हतबल झालेल्या या कामगारांनी आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेत थेट वैनगंगा नदीच्या पात्रात धाव घेतली.

“न्याय मिळेपर्यंत बाहेर येणार नाही!”

जोपर्यंत पालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत नदीपात्रातून बाहेर पडणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलक कामगारांनी घेतली आहे. आमची उपजीविकाच हिरावून घेतली असेल, तर जिवंत राहून काय करायचे? असा आर्त सवाल आंदोलक कामगारांनी उपस्थित केला आहे.

घटनास्थळी तणाव आणि पोलिस बंदोबस्त

कामगार जलसमाधीसाठी नदीत उतरल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन, महसूल यंत्रणा वैनगंगा नदीघाटावर धाव घेतली. आंदोलकांना समजावून पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू होते; मात्र कामगार आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने नदीघाटावर मोठा तणाव निर्माण झाला होता. शहराची स्वच्छता राखणाऱ्या या कष्टकऱ्यांवर आलेल्या या प्रसंगाबद्दल भंडाराकरांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्वात हा आंदोलन करण्यात आला होता

Popular Articles