यवतमाळ :- महिला व बाल विकास विभागामार्फत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या ६ ते १८ वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रीत,विधी संघर्ष ग्रस्त, बाल भिक्षेकरी, बेघर बालकांना विभागा मार्फत कार्यरत असलेल्या शासकीय / स्वयंसेवी संस्थामध्ये अंतिम पर्याय म्हणून दाखल करून त्यांना अन्न , वस्त्र, निवारा,शिक्षण ,प्रशिक्षण उपलब्ध करून देवून पुनर्वसन करण्याचा प्रयत्न विभागामार्फत करण्यात येतो. अशा अनाथ, निराधार, निराश्रीत,विधी संघर्ष ग्रस्त, बाल भिक्षेकरी, बेघर बालकांसोबत दिवाली मधील एक दिवस हा बालगृहात साजरा केल्यास प्रवेशिताचा आनंद द्विगुणीत होण्यास मदत होणार असल्याने त्यांना आपली घरची माणसे भेटल्याचा आनंदही मिळणार आहे .या संकल्पनेतून “दिवाळीचा एक दिवस आमचे समवेत” या उपक्रमा अंतर्गत शासकीय निरीक्षणगृह व बालगृह ( मुलांचे) पळसवाडी, यवतमाळ येथे बालकांना व्यवहारिक ज्ञान प्राप्त व्हावे, व्यवहाराची देवाण – घेवाण , समाजाशी व्यवहार कसा करावा ? याचे ज्ञान व्हावे तसेच वस्तु तयार करण्यासाठी लागणारे कच्चे साहित्य खरेदी ते विक्री ही सर्व प्रक्रिया याचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा. यासाठी दिपावली निमित्त बालकांच्या कला कौशल्य आणि कल्पकता यातून साकारलेल्या वस्तूचे प्रदर्शन, विक्री व आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या प्रदर्शन, विक्री व आनंद मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी विकास मीना (भा. प्र.से.) यांचे शुभ हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी बोलतांना बालकांनी तयार केलेल्या वस्तूचे (पणत्या, तोरण, माळा, फुले, आकाश दिवा, ग्रेटिंग्स, पेंटींग) व खाद्य पदार्थ (बालकांचा चिवडा/भेल, फ्रुट सलाड,आलू फिन्गर्स, कस्टर्ड, मोड आलेली कडधान्य ई.) आणि संस्थेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम व बालकांवर दिसून येणारा सकारात्मक परिणाम, तसेच कर्मचाऱ्यांची कर्तव्य सेवा व संवेदनशीलता यांचे कौतुक केले व बालकांशी हितगुज साधले. स्वामी विवेकानंदांनी दिलेला मंत्र “मछली मुक्त देणे से अच्छा, मछली पकडनेका ग्यान देणा बेहतर है” या बोधकथेतून स्वावलंबी बनण्याचा मंत्र दिला. वस्तूच्या प्रदर्शानाचे आस्थेने विचारपूस करून किती कालावधी लागला? किती खर्च आला?कोणाची मदत झाली यांची सविस्तर विचारणा केली? तसेच दिवाळीच्या पावन पर्वावर संस्थेस भेट देवून बालकांचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.
प्रमुख अतिथी कांचनकौर गाडीवाले प्रमुख न्याय दंडाधिकारी ( बाल न्याय मंडळ ) यांनी प्रदर्शनीस भेट देवून बालकांनी तयार वस्तूची खरेदी करण्याचे आवाहन केले. बाल न्याय मंडळ, वासुदेव डायरे अध्यक्ष बाल कल्याण समिती यांनी याप्रसंगी बाल कल्याण समितीच्या कामकाजाची माहिती देवून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली, या प्रसंगी बाल कल्याण समिती सदस्य, अनिल गायकवाड, अॅड. लीना आदे, बाल न्याय मंडळ सदस्य राजू भगत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, चाईल्ड लाईन, सखी वन स्टॉप सेंटर चे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारोती पवार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, संचलन पूजा राठोड, तर अधीक्षक गजानन जुमळे यांनी यांनी सर्वाचे आभार मानले.
बालकांची दिवाळी आनंदमय करण्यासाठी स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, उपस्थित होते. यांचे कडून सर्व बालकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. सर्व कर्मचाऱ्यांनी बालकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी परिश्रम घेतले.
त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी बालगृहातील सोई सुविधांची पाहणी केली. आवश्यक त्या गरजा लक्षात घेवून जिल्हा नियोजन निधीची मागणी करावी असे निर्देश दिले. यावेळी पोलीस अधीक्षक यांचे वतीने अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बालकल्याण समिती अध्यक्ष , बालन्याय मंडळ प्रमुख न्याय दंडाधिकारी यावेळी उपस्थित होते.परिसरात हरीतीमा महिला वृक्ष बीसी गृप द्वारा ५० वृक्ष लागवड करण्यात आली आहे. यांची पाहणी करून वृक्षारोपणाचे कौतुक केले.
प्रवेशितांनी बनविलेल्या वस्तूंची उपस्थित खालील विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग: जिल्हा प्रशासन, न्याय व्यवस्था, पोलीस प्रशासन, बाल न्याय मंडळ, बाल कल्याण समिती, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, आदीवासी विकास विभाग, समाज कल्याण विभाग, नगर पालिका प्रशासन, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्प लाईन, सखी वन स्टॉप सेंटर, महिला साक्षमिकरण केंद्र, संरक्षण अधिकारी, लोकमित्र, दिशा, आशीदीप, सुखाय या स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी यांनी मोठ्या प्रमाणात वस्तूची खरेदी करून खाद्य पदार्थाचा आस्वाद घेतला. असे उपक्रम दरवर्षी राबवावे अशा सुचना केल्या.






