हंसराज,भंडारा वरठी :- वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरू वार्ड येथे किरकोळ बोलचालीवरून झालेल्या वादातून एका इसमावर लाकडी मूठ असलेल्या धारदार वस्तूने प्राणघातक हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही खळबळजनक घटना दिनांक ०९/११/२०२६ रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून, घटनेचे गांभीर्य ओळखून वरठी पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपासाची चक्रे फिरवत हल्लेखोर आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नेहरू वार्ड वरठी येथील रहिवासी प्रदीप अरुण वासनिक (वय ३८ वर्षे) यांच्यासोबत आरोपी आदेश विनोद गजभिये (वय २८ वर्षे, रा. नेहरू वार्ड, वरठी) याने पूर्वीच्या बोलचालीतील वादावरून वाद घालून अश्लील शिवीगाळ केली.
हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी आदेश गजभिये याने प्रदीप वासनिक यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाकडी मूठ असलेल्या धारदार शस्त्राने त्यांच्या पोटाच्या डाव्या बाजूस सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रदीप वासनिक यांना नातेवाईकांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जखमी वासनिक यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून वरठी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ (BNS) चे कलम १०९ (१) (खुनाचा प्रयत्न) आणि कलम ३५२ (शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान करणे/शिवीगाळ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच वरठी पोलीस पथकाने वेगाने सूत्रे हलवून फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी आदेश विनोद गजभिये याला शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरठी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन जगताप व त्यांच्या तपास पथकाने केली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत.






