– १४ पायऱ्यांच्या ऑनलाइन प्रक्रियेत शेतकरी अडकले; संत्रा उत्पादकांना वेळेवर खते मिळेना !
– शेतकऱ्यांना ऑनलाइन बुकिंगच्या जाचातून मुक्त करून ऑफलाइन खत विक्री सुरू करण्याची मागणी !
– शासनाने निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज!
मोर्शी तालुका प्रतिनिधी :- राज्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खते खरेदी करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या FFS ऑनलाइन बुकिंग प्रणालीमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खत खरेदी करण्यासाठी तब्बल १४ पायऱ्यांची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी लागत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ वाया जात असून, अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींमुळे खतांची बुकिंग करणेही कठीण झाले असल्यामुळे रासायनिक खतांच्या ऑनलाइन बुकिंगची FFS प्रणाली तात्काळ बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांनी शासनाकडे केली आहे.
विशेषतः मोर्शी–वरूड हा संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या भागातील संत्रा उत्पादक शेतकरी या प्रणालीमुळे अडचणीत सापडले आहेत. संत्रा बागांना आवश्यक असलेली रासायनिक खते योग्य वेळी आणि आवश्यक प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे असते. मात्र ऑनलाइन बुकिंगच्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात खते मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
शेतीमध्ये खतांचा वापर हा हंगाम आणि पिकांच्या गरजेनुसार करावा लागतो. अशा परिस्थितीत खत खरेदीसाठी ऑनलाइन प्रक्रियेवर अवलंबून राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडत आहे. ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या, ऑनलाइन प्रक्रियेची माहिती नसणे, तांत्रिक अडचणी आणि बुकिंगमधील मर्यादा यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय वाढत आहे.
शेतकऱ्यांना खते मिळविण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेच्या जाचात अडकवण्याऐवजी त्यांना सहजपणे खते उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या नावाखाली अडचणीत आणणारी व्यवस्था राबविण्याऐवजी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन धोरण ठरविण्याची गरज आहे.
संत्रा उत्पादक शेतकरी आधीच दुष्काळ, वाढता उत्पादन खर्च, पाण्याची टंचाई आणि बाजारभावातील अनिश्चितता अशा अनेक संकटांचा सामना करीत आहेत. त्यात आता खत खरेदीसाठी ऑनलाइन बुकिंगची नवीन अडचण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
त्यामुळे शासनाने FFS ऑनलाइन बुकिंग प्रणालीचा तातडीने फेरविचार करून ही सक्तीची प्रक्रिया बंद करावी आणि पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने रासायनिक खत विक्री सुरू करावी. शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार, योग्य वेळी आणि पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांनी शासनाकडे केली आहे.
“शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याऐवजी खत खरेदीसाठी १४ पायऱ्यांची ऑनलाइन प्रक्रिया लादणे कितपत योग्य आहे? ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ऑनलाइन बुकिंगच्या अडचणींमुळे वेळेवर खते मिळत नसतील, तर अशा व्यवस्थेचा शेतकऱ्यांना काय उपयोग? शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन FFS प्रणालीची सक्ती बंद करावी. खत विक्री पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने सुरू करून संत्रा उत्पादकांसह सर्व शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते उपलब्ध करून द्यावीत. शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता शासनाने तातडीने निर्णय घ्यावा,”
– रुपेश वाळके अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.






