– वनविभागाच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ
भंडारा :- जंगलातून भरकटत आलेल्या अस्वलाने गावात पोहचून थेट एका पडक्या घरात आश्रय घेतला. हा प्रकार लक्षात आल्यावर वनविभागाने रेस्क्यू राबवून अस्वलाला पकडले आणि निसर्गमुक्त केले. मात्र या घटनेमुळे गावकरी दहशतीमध्ये आले असून अद्यापही भीतीचे वातावरण कायमच आहे. ही घटना मंगळवारी, १० नोव्हेंबर रोजी लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथे घडली.
डेपोमध्ये असलेल्या एका पडक्या घरामध्ये अस्वल
मंगळवारी, १० नोव्हेंबर रोजी सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास लाखांदूर वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या बारव्हाच्या चिचाळ येथे घडली. या गावालगत बांबू डेपो आहे. हा डेपो अगदी गावालगतच आहे. या डेपोमध्ये असलेल्या एका पडक्या घरामध्ये अस्वल लपून बसल्याचे डेपोतील कर्मचाऱ्यांना लक्षात आले. ही माहिती खोलमारा येथील पोलिस पाटलांकडून लाखांदूर वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना कळविताच क्षेत्रीय कर्मचारी व शीघ्र बचाव दलाचे सदस्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
मानवी-वन्यजीव संघर्ष पेटण्याचीही शक्यता
या ठिकाणापासून जंगलाचा नैसर्गिक अधिवास खूप लांब होता. त्यामुळे अस्वल गावकऱ्यांवर हल्ला करण्याची किंवा मानवी वस्तीकडे धाव घेण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे मानवी-वन्यजीव संघर्ष पेटण्याचीही शक्यता होती. दरम्यान घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. गोंधळामुळे अस्वल भडकून मानवी हानी होण्याची दाट शक्यता होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनकर्मचाऱ्यांनी अस्वलाला जेरबंद करण्याचा निर्णय घेतला.
अस्वल निसर्गमुक्त
मोठ्या शिताफिने अस्वलाला जेरबंद केल्यावर पशुधन विकास अधिकारी डॉ. अक्षय अडकिने यांनी अस्वलाची वैद्यकीय तपासणी केली. अस्वल नर असून शारीरिक दृष्ट्या पूर्णपणे सुदृढ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला लाखांदूर वनक्षेत्रातील त्याच्या नैसर्गिक अधिवासात अत्यंत सुरक्षितपणे निसर्गमुक्त करण्यात आले.






