– भंडारा जिल्ह्यातील जांभोरा गावात २०० वर्षांची अनोखी परंपरा; माणूस आणि पशुधनाच्या अतूट नात्याचा जागर
मोहाडी :- आधुनिकतेच्या झगमगाटात अनेक जुन्या रूढी-परंपरा लुप्त होत असताना, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील जांभोरा गावात मात्र सुमारे दोनशे वर्षांपासून चालत आलेली एक थरारक व विस्मयकारक परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जोपासली जात आहे.
वर्षभर पशुधनाचे रक्षण करणाऱ्या गुराख्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चक्क १०० ते १५० जनावरांचा कळप अंगावर घेण्याची ही अनोखी परंपरा सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरली आहे.
माणूस, पशुधन आणि निसर्गाच्या अतूट नात्याचा सुरेख संगम या उत्सवातून पाहायला मिळतो. या विशेष सोहळ्यादरम्यान सकाळी गावातील गायी व बैलांना नदीवर नेऊन स्वच्छ स्नान घालण्यात आले. त्यानंतर त्यांच्या शिंगांना विविध रंग, मोरपिसे, गळ्यात घुंगरू आणि आकर्षक गळपट्ट्या बांधून जनावरांना देखण्या रूपात सजवण्यात आले.
वर्षभर जंगलात ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता हिंस्र वन्यजीवांपासून जनावरांचे रक्षण करणाऱ्या गोवारी समाजाच्या गुराख्यांबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करणे हा या परंपरेमागचा मुख्य उद्देश आहे. सजवलेल्या जनावरांचा १०० ते १५० चा मोठा कळप धावत येत असताना अंगावर घेण्याचा हा अंगावर शहारे आणणारा थरार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विज्ञानाच्या युगातही ग्रामसंस्कृती, लोकपरंपरा आणि प्राणिमात्रांबद्दलचे प्रेम अखंड टिकवून ठेवणारे जांभोरा गाव जिल्ह्यासाठी आदर्श ठरले आहे.






