तुमसर :- तुमसर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मौजा डोंगरला (जि. भंडारा) ग्रामपंचायतीमधील विविध विकास कामांतील कथित भ्रष्टाचाराची अखेर प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर पंचायत समिती प्रशासनाने तीन सदस्यीय अधिकृत चौकशी समिती गठीत केली आहे.
डोंगरला येथे शासकीय योजनांच्या विकास कामांत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची लेखी तक्रार ग्रामस्थांनी २९ सप्टेंबर रोजी केली होती. जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तुमसरचे गट विकास अधिकारी न. द. वाळकेकर यांनी ही कारवाई केली. या चौकशी समितीत सहाय्यक गट विकास अधिकारी एम. एल. वासनीक, विस्तार अधिकारी यु. के. पाठे आणि कनिष्ठ अभियंता पुजारी यांचा समावेश आहे.
ही समिती १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन संयुक्त चौकशी करणार असून, सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. चौकशीदरम्यान सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि तक्रारदारांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या चौकशीमुळे गैरव्यवहाराचे पितळ उघडे पडणार का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.






