spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान ‘जनजाती गौरव सप्ताह’ उत्साहात साजरा होणार-आमदार राजु तोडसाम

पांढरकवडा :- भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून आणि त्यांच्या क्रांतीचा व विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी राज्यभर व देशपातळीवर जनजातीय समुदायामध्ये ‘जनजाती गौरव दिन’ साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार यंदा ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत ७ दिवसांचा ‘जनजाती गौरव सप्ताह’ आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती केळापूर-आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. राजु तोडसाम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हा व तालुका पातळीवर पत्रकार परिषदा घेऊन विविध उपक्रमांची माहिती जनमानसापर्यंत पोहोचवली जात आहे. या सात दिवसांच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या प्रमुख उपक्रमांची रूपरेषा आमदार प्रा. राजु तोडसाम यांनी पत्रकार परिषदेत खालीलप्रमाणे मांडली.

*११ व १२ नोव्हेंबर : जिल्हा व तालुका पातळीवर पत्रकार परिषदांचे आयोजन करून सप्ताहातील नियोजित उपक्रमांची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहचविण्यात येईल

*१३ नोव्हेंबर (योजना जनजागृती व लाभांचे वाटप): आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी योजनांचा प्रचार-प्रसार करणे, लाभार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून धनादेश वाटप करणे, प्रधानमंत्री जनमन योजनेचे लाभ देणे तसेच महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक बचत गटाला १ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्णय अमलात आणले जातील. तसेच लाभार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या लाभांचा आढावा घेतला जाईल.

*१४ नोव्हेंबर (स्मारकांची स्वच्छता व दीपोत्सव ): बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि अण्णाभाऊ साठे यांसारख्या महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करून संध्याकाळी त्या ठिकाणी दीपमाळा लावून प्रकाशमय वातावरण तयार केले जाईल. तसेच देवदेवतांच्या पूजा-अर्चा करण्यात येईल.

*१५ नोव्हेंबर (बिरसा मुंडा जयंती व ग्रामसभा): भगवान बिरसा मुंडा जयंतीच्या दिवशी प्रत्येक गावातील आदिवासी पाड्यांवर व विविध ठिकाणी विशेष ग्रामसभा घेऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.

*१७ नोव्हेंबर (आरोग्य व पोषण शिबिरे): आरोग्य व पोषण जनजागृती शिबिरांचे आयोजन करून आदिवासी समाजात मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या ‘सिकलसेल’ आजाराची तपासणी व उपचारांवर भर दिला जाईल. तसेच शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत मार्गदर्शन केले जाईल.

*१८ नोव्हेंबर (सांस्कृतिक व सामाजिक सक्षमीकरण – समारोप): सप्ताहाचा अंतिम दिवस ‘आदिवासी आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व सक्षमीकरण दिवस’ म्हणून साजरा केला जाईल. या समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे व महिला बचत गटांचे मार्गदर्शन, बँकिंग व डिजिटल व्यवहारांची माहिती, शेती व शेतीपूरक योजनांचे मार्गदर्शन आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाबाबतची माहिती देण्यात येणार आहे.

या सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समुदायासह सर्व घटकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवणे आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करणे हा राज्य सरकारचा मुख्य उद्देश असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला भाजपा तालुकाध्यक्ष आनंद वैद्य, भाजपा जिल्हा सरचिटणीस किशोर देशट्टीवार, भाजपा जेष्ठ नेते सुनील बोकीलवार यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Popular Articles